मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (11:09 IST)

प्रताप सरनाईक यांनी ईडीकडे एक आठवड्याची मुदत मागितली

सुरक्षा रक्षक सेवा पुरविणार्‍या टॉप सिक्युरिटी कंपनीत विदेशी निधीचा गैरवापर झाल्याच्या शक्यतेतून तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर राहण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते व आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या पुत्रांनी एक आठवड्याची मुदत मागितली आहे. कोव्हीडच्या निर्बंध आणि नियमांचा आधार घेत सरनाईक यांनी ईडीकडे ही मागणी केली आहे.
 
टॉप सिक्युरिटी या कंपनीचे मुख्यालय अंधेरी येथे आहे. मुंबई आणि राज्यासह देशात विविध ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवले जातात. सरनाईक कुटुंबाचे या कंपनीच्या प्रवर्तकांशी आर्थिक संबंध आहेत. कंपनीच्या ब्रिटनमध्ये असलेल्या प्रवर्तकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम मुंबईत धाडण्यात आली व त्याचा गैरवापर झाला असा ईडीला संशय आहे. याच अंतर्गत मंगळवारी प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या मुलांच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे. सरनाईक यांचा पुत्र विहंग याची ईडीने तब्बल सात तास कसून चौकशी केली.
 
कारवाईची माहिती मिळताच प्रताप सरनाईक यांनी घर गाठले. कोव्हीडचा आधार घेत सरनाईक यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्या मेहुण्याने ईडीला पत्र दिले आहे. सरनाईक हे बाहेरून आल्याने ते नियमानुसार क्वारंटाईन झाले आहेत. सोबतच पुत्र पूर्वेश यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर, पुत्र विहंग आणि त्यांची पत्नी अतितणावाने रुग्णालयात भरती झाली आहे.