शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जुलै 2017 (12:14 IST)

गरोदरपणाच्या कालावधीत महिला कंडक्टरना बसवर त्यांना कार्यालयीन काम द्यावे

राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून काम करणाऱ्या ७०% महिला कर्मचाऱ्यांचा गर्भपात झाला असल्याची धक्कादायक बाब एका अहवालात समोर आली आहे. गरोदरपणाच्या कालावधीत महिला कंडक्टरना बसवर वाहक म्हणून न पाठवता त्यांना कार्यालयीन काम द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ  यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली. मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मागणीची अमलबजावणी करणार असे आश्वासन दिले.
गर्भधारणा झालेल्या महिला वाहकांना सततचा प्रवास, प्रवासादरम्यान होणारी असुविधा, धक्काबुक्की अशा अनेक कारणांमुळे गर्भपाताला सामोरे जावे लागत आहे. गरोदरपणाच्या काळात त्यांना डेस्क वर्क द्यावे अशी सातत्याने मागणी होऊनही त्याबाबत परिवहन खाते असंवेदनशील असल्याचे जाणवते. प्रत्येक महिलेला जन्म देण्याचा अधिकार आहे. त्यांची आवश्यक ती काळजी सरकारतर्फे घेण्यात आली पहिजे. मात्र या प्रकरणात तर सरकारी महिला कर्मचारीदेखील मुख्य सुविधांपासून वंचित असल्याचे जाणवते. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. महिला राष्ट्रवादी काँग्रेस या घटनेचा निषेध करते. महिलांच्या आरोग्याविषयक ठोस पावले उचलण्याची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत. राज्य परिवहन महामंडळात काम करणाऱ्या महिला वाहकांना न्याय मिळालाच पाहिजे, असा आग्रह वाघ यांनी केला आहे.