गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 नोव्हेंबर 2016 (16:26 IST)

महास्वच्छता अभियन सांगता समारंभाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात झाले भव्य बाईक रॅलीचे आयोजन

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 'माझे शहर स्वच्छ शहर' महास्वच्छता अभियानांतर्गत ठाणे शहरात विविध उपक्रम राबविले जात आहे. ठाणे परिसर स्वच्छता ठेवण्याचा संदेश जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आज २२ ऑक्टोबर रोजी विटावा सर्कल ते कळवा नाका आणि खारीगाव पासून पुन्हा कळवा अशी भव्य  बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत हजारांहून अधिक महिला आणि पुरुष बाईकचालकांचा समावेश होता. उद्या २३ ऑकटोबर रोजी होणाऱ्या या अभियानाच्या सांगता समारंभाच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या या रॅलीचे संपूर्ण ठाणेकरांनी मनसोक्त आनंद लुटला. 
 
स्वच्छतेप्रती  सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या रॅलीच्या स्वागत समारोहाला मराठीचे ख्यातनाम अभिनेते मंगेश देसाई, नगरसेविका सौ . प्रमिला किणी, सौ. अपर्णा साळवी,नगरसेवक मुकुंद किणी, नगरसेवक अक्षय ठाकूर, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बरपुल्ले, सह आयुक्त चारुशीला पंडित तसेच कार्यालयीन अध्यक्ष श्री.जोशी यांची उपस्थिती होती.  
 
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने १ ऑक्टोबर, २०१६ पासून या महास्वच्छता अभियानाची सुरूवात करण्यात आली होती,  या अभियानांतर्गत ठाणे शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यातआली आहे. ज्यामध्ये सर्व रस्ते, चौक, उड्डाणपुला खालील जागा, तलाव, गृहनिर्माण संकुले, शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, मैदाने, भाजी मंडई, आरोग्यकेंद्रे आदींचा समावेश आहे. तब्बल २२ दिवस यशस्वीरित्या राबविल्या गेलेल्या या अभियनाचा उद्या २३ ऑक्टोबर रोजी दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलामध्ये मोठ्या दिमाखात सांगता समारंभ पार पडणार आहे. या भव्यदिव्य समारंभांमध्ये तब्बल ५ लाख ठाणेकरांची  उपस्थिती अपेक्षित आहे. 
 
उद्या होणाऱ्या सांगता समारंभाचे स्वरूप मोठे असून या समारंभात मा. एकनाथ शिंदे, मा. संजय मोरे, मा.संजीव जयस्वाल, मा. राजन विचारे, मा. प्रताप सरनाईक, मा. जितेंद्र आव्हाड तसेच प्रसिद्ध  बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय, प्रसिद्ध अभिनेत्री अम्रिता राव,इशा कोप्पीकर, सुजेन बर्नेट यांच्यासह मराठीतील प्रशांत दामले, मंगेश देसाई, भाऊ कदम, मधुरा वेलणकर,प्राजक्ता माळी,सुप्रिया पाठारे, चिन्मय उदगिरकर या मातब्बर कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे. शिवाय ठाणे शहरातील १५० बायकर्सची शहरातून जनजागृती बाईक रॅली ठाणे महानगरपालिका ते दादोजी कोंडदेव क्रिडासंकुल पर्यंत काढण्यात येईल. एवढेच नव्हे तर शहरातील २५ हजार विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या सहभागाने आनंद नगर ते पाटलीपाडा आणि तीन हात नाका ते माॅंसाहेब मीनाताई ठाकरे चौकापर्यंत भव्य दिव्य अशी स्वच्छता मानवी साखळीची देखील उभारली जाणार आहे.