Widgets Magazine
Widgets Magazine

हिंदुत्वात मराठीपण सुरक्षित आहे.

Last Modified बुधवार, 15 फेब्रुवारी 2017 (10:53 IST)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी गेल्या दोन दिवसात आपण आणखी कडक होऊ शकतो हे दाखविण्यासाठी भाजपशी नेहमीसाठी संबंध तोडण्याची भाषा केली आहे . त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे . भाजपशी सहजीवन केल्याने शिवसेना सडली असे विधान उद्धव ह्यांनी काही दिवसापूर्वी केले होते पण भाजपच्या नेतृत्वाखालील दोन सरकारातून बाहेर पडण्याविषयी ते काही बोलले नव्हते .त्यामुळे आपल्या बरोबरीच्या लोकांना सडलेल्या अवस्थेतून बाहेर काढतांनाही ते नफ्यातोट्याचा विचार प्रथम करतात

असे दिसते ,भाजपबरोबर राहून शिवसेना सडली असे म्हणून उद्धव आपल्या पित्याचा म्हणजे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे ह्यांचा घोर अपमान करत आहेत हे त्यांच्या लक्षात आलेले दिसत नाही . भाजपबरोबर युती करून हिंदुत्वाचे व्यापक आणि प्रसरणशील राजकारण करण्याचा बाळासाहेबांनी निर्णय घेतला आणि त्या विचाराला ते शेवटपर्यंत चिकटून राहिले. युतीची फळे त्यांना गोड लागली .शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले,अतिशय मानाचे असे लोकसभेचे सभापतिपद मिळाले , मुंबई महापालिकेत कर्त्याधर्त्याच्या भूमिकेत अधिकार गाजविता आला . ह्या फलप्राप्तीला उद्धव , ' सडणे ' म्हणत असतील तर त्यांना खरोखरीच काहीतरी वेगळे करून दाखविण्याची ईर्षा आहे आणि त्यासाठी एकांत हवा आहे , एकांताचे स्वातंत्र्य हवे आहे आणि ते मिळाले की मुंबईचा अंतर्बाह्य कायापालट करून दाखविण्याचे त्यांचे स्वप्न आहे असे म्हणता येईल. पण त्याकरिता बाळासाहेबांना अडगळीला टाकण्याचे त्यांचे औद्धत्य शिवसैनिक मुकाटपणे मान्य करतील असे वाटत नाही . सडण्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो . म्हणजे बाळासाहेबांच्या काळातच सडण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली होती असे उद्धव ह्यांना सुचवायचे आहे .हाच बाळासाहेबांचा अपमान आहे . कारण शिवसेनेची ती अवस्था त्यांनी कधीच मान्य केली नसती . भाजपशी युती करून बाळासाहेबांनी शिवसेनेसाठी आणि मराठी माणसासाठी जे मिळविले त्यापेक्षा आपण बरेच काही अधिक मिळविणार आहोत आणि त्यासाठी भाजपच्या सहकार्याची आवश्यकता नाही असे उद्धव ह्यांना सुचवायचे आहे . ह्या संदर्भात ते भविष्यात प्रादेशिक पक्षांना देशाच्या राजकारणात अधिक वाव मिळणार आहे असे पालुपद गिरवीत आहेत . त्यांचे मनोराज्य वास्तवाच्या किती जवळ आहे ते तपासले पाहिजे .

ह्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष नागमोडी चाल खेळण्याची शक्यता आहे . भाजपाला सगळ्यात जास्ती जागा मिळू नयेत म्हणून आयत्यावेळी काँग्रेस आपली काही मते शिवसेनेकडे वळविण्याची शक्यता नाकारता येत नाही .उद्धवना तीच आशा आहे . नरेंद्र मोदींच्या जनमानसातील स्थानाला धक्का देण्यासाठी काँग्रेस कोणत्याही स्तराला जाऊ शकते . पन्नास वर्षांपूर्वी राम मनोहर लोहिया ह्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसविरोधी एकजूट बांधण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला . त्यानंतर दहा वर्षांनी जयप्रकाश नारायण ह्यांनी तोच प्रयोग करून केंद्रात बिगर काँग्रेसी सरकार सत्तारूढ केले . पण लोहिया आणि जयप्रकाश ह्यांनी संघाला आणि जनसंघ-भाजप ह्यांना अस्पृश्य मानले नव्हते . सध्याच्या स्थितीत काँग्रेसच्या सहकार्याने सर्व प्रादेशिक पक्षांची भाजपच्या विरोधात एकजूट बांधण्यात आली तरी तेथेही शिवसेनेची कोंडीचा होण्याची शक्यता आहे . कारण काँग्रेस आणि अन्य पक्ष शिवसेनेसारख्या हिंदुत्वनिष्ठ पक्षाशी उदारपणे ,आदराने आणि मैत्रीपूर्ण वर्तन ठेवतील असा त्यांचा परिपाठ नाही . भाजपमध्ये आणि शिवसेनेमध्ये हिंदुत्वाचा एक समान धागा आहे . तसे बंधन शिवसेना आणि अन्य पक्षात नसल्याने उलट अन्य पक्षांना ज्याचा तिटकारा आहे ते हिंदुत्व शिवसेना जवळ बाळगीत असल्याने त्या पक्षांचे शिवसेनेशी सामोपचाराने वर्तन होईल अशी अपेक्षा बाळगता येत नाही . शिवसेनेला आपल्या अस्तित्वासाठी एकतर हिंदुत्वाचा त्याग करावा लागेल किंवा पुन्हा एकला चलो रे करावे लागेल . हा उलटसुलट प्रवास उद्धव ह्यांच्या प्रकृतीला झेपणार आहे का ह्याचा विचार करावा लागेल . > मी नेहमी सांगत आलो आहे ते पुन्हा सांगतो की मराठी माणसाला शिवाजी महाराजांच्या विचाराच्या जवळ नेण्यासाठी शिवसेनेचा जन्म आहे . शिवसेनेच्या सुरवातीच्या काळात स्थानिक शाखा काही निमित्ताने स्मरणिका काढत , त्यात माझे शिवसेनेच्या जन्माविषयीचे आणि अंतिम उद्दिष्टाविषयीचे लेख प्रसिद्ध झाले आहेत . त्यावेळी जे शाळेत जात होते त्यांनी कदाचित ते लेख वाचले नसावेत . यशवंतराव चव्हाणांची इच्छा असो वा नसो त्यांना महाराष्ट्राची निष्ठा नेहरूंविचाराला वहावी लागली . आचार्य अत्र्यांना महाराष्ट्रावरचा कम्युनिष्टांचा प्रभाव कमी करता येत नव्हता . अशावेळी शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे राजकारण आणि समाजकारण करणाऱ्या संघटनेची आवश्यकता होती .. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायाने व्यंग चित्रकार म्हणून सुस्थापित झालेले आणि अन्यायाविरुध्द् आतून पेटलेले एक तरुण बाळ केशव ठाकरे ह्यांनी शिवसेना काढण्याचा आणि जोपासण्याचा निर्णय घेतला . मराठी माणसाला कारकुनी मनोवृत्तीतून बाहेर काढून भारतावर राज्य करण्यासाठी तुझा जन्म आहे आणि शिवाजीला आदर्श मानून ते काम तुला करायचे आहे हा विश्वास मराठी मानसिकतेत निर्माण करायचा होता . काम कठीण होते . सुदैवाने शिवसेनेला सुरवातीला जे कार्यकर्ते मिळाले ते ध्येयवादी,स्वार्थत्यागी, कामाचा प्रचंड उरक असलेले , प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी प्रसंगी अस्तन्या वर करु शंकणारे आणि दूरदृष्टी म्हणजे काय ह्याची कल्पना असणारे असे मिळाले . अश कार्यकर्त्यांनी स्थानीय लोकाधिकार समिती स्थापून मराठी माणसांना मोठ्या प्रमाणावर बँकात आणि मोठमोठ्या कंपन्यात चांगल्या नोकऱ्या मिळवून दिल्या . ह्या तरुणांकडे कृतज्ञता होती आणि त्या कृतज्ञतेतून शिवसेनेचा खोल पाया बांधला गेला . मग सेवाप्रकल्पाचे अनेकांगी धुमारे सेनेला फुटत गेले . लोकांचा आदर आणि प्रेम वाढले . हा सगळा संसार प्रमुख आणि सत्तारूढ राजकीय पक्ष काँग्रेस ह्याची अवकृपा झेलीत उभा करायचा हे काम सोपे नव्हते , कारण शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सगळी बांधणी नव्याने करायची होती . शिवसेनेत जातपात नव्हती. हिंदुत्वाचा पीळ होता . पण त्याला शास्त्रीय बैठक प्राप्त होणे आवश्यक होते . मधल्या काळात भाजपशी गाठ पडली . भाजपचे तरुण संघाच्या मांडवाखालून गेले होते.त्यामुळे वास्तविक त्यांच्या निष्ठांविषयी शंका घेण्याचे कारण नव्हते ,पण अवदसा आठवली आणि भाजपच्या लोकांना गांधीवादी समाजवाद जवळचा वाटू लागला . ती वस्त्रे फार टिकली नाहीत . तेव्हढ्यात गुजरातमध्ये नरेंद्र मोदींचा उदय झाला आणि भाजपाची वाटचाल पुरुषार्थाच्या दिशेने पुन्हा होऊ लागली . महाराष्ट्रात शिवसेना काढून जे काम बाळासाहेबांनी केले ते काम देश पातळीवर मोदींनी केले . अर्थात मोदींचे परिप्रेक्ष्य पुष्कळ मोठे होते . हिंदवी स्वराज्य हेच त्यांचे उद्दिष्ट असले तऱी त्यांचा पसारा बहुत मोठा आहे . शिवसेनेचे सुसंस्कारीत ,व्यापक ,सर्वसमावेशक आणि आंतरराष्ट्रीय स्तर असलेले रूप म्हणजे भाजप आहे . अशावेळी शिवसैनिकांनी मोदींच्या भाजपला धरून राहणे हे त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य ठरते , भाजपाला आणि नरेंद्र मोदींना दुबळे करण्याचा प्रयत्न करून आणि काँग्रेसच्या सहकार्याने मोठे होण्याची धडपड करून शिवसेनेचा मराठी माणूस आणि मराठी माणसाची शिवसेना शिवाजी महाराजांशी द्रोह करणार आहे . कारण शिवाजी कधीही काँग्रेसचा आदर्श नव्हता . स्वातंत्र्य आंदोलनात आणि स्वांतंत्र्योत्तर काळातही काँग्रेसने शिवाजीला आदर्श मानलेले नाही . भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे प्रमुख परवेज मुशर्रफ ह्यांची आग्र्यात उभयपक्षी चर्चा सुरु झाली तेव्हा त्या चर्चेतून चांगले घडावे म्हणून त्यावेळचे राष्ट्रपती नारायणन ह्यांनी आग्र्याजवळ असलेल्या अकबर बादशहाच्या कबरीला हात जोडले . आग्ऱ्यातून शिवाजी महाराज जसे सुखरूप बाहेर पडले तसे पाकिस्तानच्या बरोबर असलेल्या समस्यांतून भारत सुखरूप बाहेर पडेल अशी करुणा भाकण्याची इच्छा त्याना झाली नाही . हिंदुत्वविरोधक आणि हिंदुत्वप्रेमी ह्यांच्या इतके अंतर आहे . शिवसैनिकांनी निवड करायची आहे . मराठी माणसाने निवड करायची आहे . सर्व सुजाण नागरिकांनी परिपक्वतेला, अनुभवाला आणि व्यापक हिताला मतदान करावयाचे आहे. हिंदुत्वात मराठीपण सुरक्षित आहे ह्याचे भान ठेवायचे आहे.> ज्येष्ठ पत्रकार, लेखक, वक्ते श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांचा लेख. लेखाच्या तळाशी त्यांच्या संपर्क क्रमांक व ईमेल दिला आहे. कुणाला काही प्रश्न विचारायचे असल्यास अरविंदराव समर्थपणे उत्तर देऊ शकतात, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी
मोबाईल: 9619436244
ईमेल:
arvindvk40@gmail.com

https://arvindvkulkarni.wordpress.com/
यावर अधिक वाचा :