शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017 (09:30 IST)

बँका, शासकीय कार्यालयात काम पूर्ववत ; आचारसंहिता शिथिल

नाशिक महापालिकेसह, जिल्हा परिषदेची लागलेली निवडणूक , त्यातच शुक्रवारी महाशिवरात्र, सलग चौथा शनिवार आणि रविवार यानंतर सोमवारी सर्व बँकां, शासकीय कार्यालये पूर्ववत सुरू झाली. तब्बल तीन दिवसांनंतर बँका उघडल्याने सकाळपासून व्यवहार करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. या दिन दिवसात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले होते.
 
जिल्हा परिषद तसेच महापालिका निवडणूक 21 फेब्रुवारीला होती. त्यापूर्वीच आचारसंहिता लागल्याने महापालिकेसह शासनाच्या महसूल, आदिवासी विकास विभाग, विद्यापीठ, एसटी आदी विविध भागातील कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त होते. कर्मचारी जागेवर सापडत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली होती. कोणत्याही शासकीय कार्यालयात गेल्यास केवळ आचारसंहितेचे कारण दाखवत नागरिकांना परत पाठविण्याचे प्रकार या काळात घडले.
 
त्यामुळे कधी एकदा निवडणूक संपते असे नागरिकांना वाटत होते. आचारसंहिता असल्याने नवीन विकासकामांनाही सुरुवात करता येत नव्हती त्यामुळे सर्वच कामांना ब्रेक लागल्याची स्थिती होती; परंतु प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर आचारसंहिता शिथिल करण्यात आली असली तरी निवडणुकीच्या कामाचा ताण घालविण्यासाठी कर्मचार्‍ंयांनी घेतलेल्या सुट्या तसेच 24 तारखेला आलेली महाशिवरात्र त्यानंतर लागोपाठ आलेला शनिवार आणि रविवार यामुळे सलग तीन दिवस सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. परंतु सोमवारी हे व्यवहार पूर्वपदावर आले.
 
शासकीय आस्थापनांमध्ये अधिकार्‍यांनी सकाळपासून आपल्या कर्मचार्‍यांच्या बैठका घेत त्यांना कामाला लावले. यावेळी अपूर्ण स्थितीतील काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित कर्मचार्‍ंयाना दिल्या. त्यामुळे सोमवारी सर्वच अस्थापनांमध्ये बैठकांमध्ये दिवस व्यस्त गेल्याचे चित्र पहायला मिळाले. शासकीय आस्थापनांमध्ये हे चित्र होते तर शाळांमध्येही परिस्थिती सारखी होती. तीन दिवसानंतर शाळा उघडल्याने रस्ते विद्यार्थ्यांनी फुलले होते तर प्रवासी वाहतूक वाढल्याने रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली होती.
 
बँकांचे व्यवहारही पूर्वपदावर आल्याने सकाळपासून मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी सर्वच बँकांमध्ये पहायला मिळाली. चेक टाकणे, रक्कम काढणे, थकलेली बिले काढणे आदीसाठी सकाळपासूनच बँकांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली केली. सोमवारी बँकांमधील व्यवहार पूर्वपदावर आल्याने एटीएममध्येही पैसे असल्याची स्थिती होती. सर्वच एटीएममध्ये कॅश टाकल्याने त्यावरही नागरिकांची चांगली गर्दी दिसून आली. एकूणच निवडणुकानंतर शहर पूर्वपदावर झाल्याचे चित्र सोमवारी पहायला मिळाले तर कामे मार्गी लागल्याने नागरिकांच्या चेहर्‍यावरही समाधान आल्याची स्थिती होती.