बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 सप्टेंबर 2017 (17:00 IST)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आदिवासी पाड्यातील ३५ मुलींची निवड

मुलींच्या शैक्षणिक विकास साधण्यासाठी मुक्त विद्यापीठ कटीबद्ध
- कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन
 बदलत्या स्थितीत शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. तंत्रज्ञानाची प्रगती, बहुमाध्यमांचा प्रभाव पाहता शिक्षण संस्थांसमोर आव्हाने ठाकली आहेत. त्याचा सामना करण्यासाठी पायाभूत शिक्षणाचा विकास साधण्याची नितांत गरज आहे. मुक्त विद्यापीठाच्या कार्यप्रणालीत विद्यार्थी हा केंद्रबिंदू असून ग्रामीण भागातील मुलींचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी मुक्त विद्यापीठ कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या वतीने पुण्यात श्री भगवानराव नपाते फौंडेशनमध्ये रुग्णसहायक अभ्यासक्रम चालविण्यात येतो. समाजातील गरजू मुलींसाठी सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमात सावित्रीबाई फुले फौंडेशनच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील शेरपाडा, देवरगाव येथील ३५ आदिवासी मुलींची निवड करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात कुलगुरू प्रा. वायुनंदन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले फौंडेशनच्या श्रीमती स्वाती वानखेडे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील, त्र्यंबक भागवत, मधुकर राऊत, शिक्षणशास्र विद्याशाखेच्या संचालक डॉ. संजीवनी महाले आदी उपस्थित होते.

कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन म्हणाले, ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मुलीनी शिक्षणाच्या प्रवाहात यायला हवे. याकामी आपण विद्यापीठातर्फे सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. सामाजिक बांधिलकीतून चालविण्यात येणाऱ्या पुण्याच्या श्री भगवानराव नपाते फौंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. या संस्थेत सध्या गरीब आणि वंचित घटकांतील शेकडो मुली नर्सिंगचे प्रशिक्षण घेत असून आजवर दोन हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी हा शिक्षणक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
वैद्यकीय क्षेत्रात समाजसेवेचा वारसा जपणाऱ्या या संस्थेतील जवळपास हजारहून अधिक मुली महाराष्ट्रील नामांकित हॉस्पिटलांत रुग्णसेवेचे काम करीत असून पुढील काळात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सेवा, सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. आज नोकरी मिळवण्याकरता मल्टीस्किल असणे आवश्यक आहे. हे स्किल देण्याचे काम मुक्त विद्यापीठ करीत असेही त्यांनी सांगितले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञानतज्ञ अर्चना देशमुख यांनी यावेळी आदिवासी महिला आणि किशोरवयीन मुलींना फळप्रक्रियेबद्दल माहिती दिली.

आदिवासी मुलींचे शिक्षणशुल्क माफ
विशेष म्हणजे, रुग्णसहायक अभ्यासक्रमासाठी आदिवासी भागातील निवड करण्यात आलेल्या ३५ मुलींचे शिक्षण शुल्क विद्यापीठाच्या वतीने माफ करण्यात आल्याचे कुलगुरू प्रा. वायुनंदन यांनी यावेळी सांगितले. शिवाय विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांनी या मुलींच्या शैक्षणिक खर्चाचा भार उचलून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावित्रीबाई फुले फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती स्वाती वानखेडे यांनी केले. त्र्यंबक भागवत यांनी आभार मानले. यावेळी आदिवासी भागातील महिला, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.