गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 30 एप्रिल 2015 (10:30 IST)

आता आठवडय़ातून पाच दिवसच शाळा

मुंबईसह राज्यातील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांसाठी ही गुड न्यूज आहे. मुंबईसह राज्यातल्या अनेक शहरांमध्ये प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शनिवार, रविवारची सुटी असते आणि पाच दिवसांचा आठवडा असतो. पण सहा दिवस शाळा चालली पाहिजे असा आग्रह शिक्षणाधिकारी धरत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये असंतोष होता.
 
लोक भारतीचे अध्यक्ष, मुंबईचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मंत्रालयात राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी शाळांना पाच दिवसांचा आठवडा करण्यास कोणतीही हरकत नसल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला. मुंबईच्या शिक्षण उपसंचालकांना त्यांनी फोन करुन त्याबाबत तातडीने आदेशही दिले. 
 
शाळेच्या आणि अभ्यासाच्या ताणातून मुलांची सुटका झाली पाहिजे आणि शनिवार, रविवार दोन दिवसांची सुटी मिळाली पाहिजे अशी मागणी करत कपिल पाटील यांनी यात आरटीईची कोणतीही अडचण येत नसल्याचे दाखवून दिले. शिक्षण सचिवांनी आरटीई आणि शासन निर्णय (29 एप्रिल 2011) यांची कोणतीही बाधा येत नसल्याने ‘पाच दिवस शाळा चालविण्यास आडकाठी न करता पाच दिवस शाळा चालविण्यास आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी’ असे लेखी आदेशच पाठवले आहेत.
 
मुंबईसारख्या मोठय़ा शहारांमध्ये अनेक शाळा पूर्वीपासून पाच दिवसाच्या आठवडय़ाने चालतात. उर्वरित शाळा शनिवारी अर्धवेळ चालतात. शिक्षणतज्ज्ञ आणि बालमानसशास्त्रज्ञ यांच्या मते आठवडय़ात किमान दोन दिवस मुलांना सुटी देणे आवश्यक आहे.