शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

इमारत दुर्घटने प्रकरणी नवीन कायदा करणार

WD
मुंबई आणि उपनगरात पावसाळा सुरू झाल्यापासून मागील एका महिन्यात इमारत दुर्घटनेच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचपाश्र्वभूमीवर इमारत दुर्घटनेप्रकरणी नगरविकास विभाग नवीन कायदा करण्याचा विचार करीत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मागील दोन महिन्यांत मुंबईसह उपनगरांत इमारत दुर्घटनेच्या आतापर्यंत पाच घटना घडल्या आहेत. त्यात अनेक लोकांचे प्राण गेले. बुधवारी रात्री भिवंडीत इमारत कोसळून तीन जण मृत्यूमुखी पडले आहेत. अशा वाढत्या घटना पाहता सरकारने इमारत दुर्घटनेप्रकरणी नवीन कायदा करण्याचे ठरविले. या कायद्याअंतर्गत इंजिनिअर,आर्किटेक्टवर कारवाई करण्याची तरतूद असेल, असे अजित पवारांनी सांगितले.

बुधवारी भिवंडीत घडलेली इमारत कोसळण्याची पाचवी घटना आहे. इमारत कोसळणा-या इमारतींसाठी इमारतीच्या आर्किटेक्ट आणि इंजिनिअरलाही जबाबदार धरले जाणार असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहेत.

४ एप्रिलला शिळफाट्याच्या ‘लकी कंपाउंड’ मध्ये कोसळलेल्या इमारतीत ७४ बळी गेले आहेत. त्यानंतर १० जूनला माहिमची ‘अल्ताफ मेन्शन’ कोसळली. त्यात १० जणांचा मृत्यू झाला. २१ जूनला मुंब्रात ‘स्मृती’ अपार्टमेंट इमारत कोसळली त्यात १० जणांचा मृत्यू झाला तर त्याच्या दुस-या दिवशी २२ जूनला दहिसरमधे ‘पियूश’ को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी कोसळली त्यात ७ जणांच्या बळी गेला. या वाढत्या घटनामुळे ठाणे जिल्ह्यातील इमारतींवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा इमारत दुर्घटनांमध्ये एकट्या ठाणे जिल्ह्यात ८७ जण मृत्यूमुखी पडले आहेत. ठाणे जिल्ह्यात हे अपघात का होत आहेत? ठाणे जिल्ह्यात अनधिकृत इमारतींचे पेव का फुटले आहे? प्रशासन डोळेझाक का करीत आहे? असे अनेक प्रश्न त्यानिमित्ताने पुढे आले आहेत.