शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: पंढरपूर , शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (12:04 IST)

उजनी आज उपयुक्त पातळीत येणार

चोवीस तासात धरण अकरा टक्के वधारले
पुणे जिल्ह्यात मुळा व मुठा नदीच्या परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनीत येणार्‍या पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने धरण चोवीस तासात अकरा टक्के वधारले असून गुरूवारी सायंकाळी ते वजा पाच टक्के होते. शुक्रवारी पहाटेपासून उजनी उपयुक्त पातळीत भरण्यास सुरूवात होईल.
 
उजनी धरणात येणार्‍या पाण्याचा विसर्ग गुरूवारी सांकाळी 65 हजार क्युसेक्सचा इतका होता. जो सकाळी 68 हजार क्युसेक्सच्या पुढे गेला होता. काल सायंकाळी खडकवासला धरणातून 27 हजार क्युसेक्स पाणी सोडले जात असल्याने यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. टेमघर, पानशेत, खडकवासला व वरसगाव यासह पवना, मुळशी प्रकल्पांवर होत असलेल्या पावसामुळे हे पाणी उजनीला मिळत आहे.
 
उजनीची पाणीपातळी गुरूवारी सायंकाळी 490.602 मीटर होती तर धरण वजा 5.46 टक्के आहे. धरणात येणार्‍या 65 हजार क्युसेक्सच्या  विसर्गाचा विचार करता पुढील काही तासात धरण मृतसाठय़ातून उपयुक्त पातळीत भरण्यास सुरूवात होईल. मे महिन्याच्या  मध्याला धरण मृतसाठय़ात गेले होते. 
 
यंदा पावसाने ओढ दिल्याने पुणे जिल्ह्यातील प्रकल्पांवरच जुलैच्या मधला दमदार पाऊस सुरू झाला. भीमा खोर्‍यातील या मुसळधार पावसामुळे भीमा खोर्‍यातील धरणे आता भरू लागली आहेत तर याचा फायदा उजनीला देखील झाला आहे.