मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , सोमवार, 5 मे 2014 (16:43 IST)

कोकण रेल्वे अपघात; मृतांचा आकडा 22वर

दिवा- सावंतवाडी पॅसेंजरला रविवारी सकाळी झालेल्या अपघातातील मृतांची संख्या आता 22 झाली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जखमी रुग्णांची आज (सोमवार) भेट घेतली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या वारसाला दोन लाख तसेच गंभीर जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणाही करण्यात आली. त्याचबरोबर अपघातातील इतर सर्व जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

चव्हाण यांनी रोहा येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेवून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर ज्या ठिकाणी अपघात झाला त्या रेवोली येथे जाऊन ज्यांनी पाहणी केली. रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे, कोकणचे विभागीय आयुक्त आर.एल.मोपलवार तसेच उपस्थित वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्‍याची गरज असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, रविवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला नागोठण्याजवळील भिसे खिंडी बोगद्याजवळ भीषण अपघात झाला होता. इंजिनसह चार डबे रुळावरून घसरले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी रविवारीच चर्चा केल्याचे समजते.