मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , रविवार, 1 मार्च 2015 (18:49 IST)

गरिबी नव्हे तर गरिबांना संपविणारा अर्थसंकल्प : राष्ट्रवादी

केंद्राने मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसांना निराश करणारा आहे. नोकरदार वर्गाला आयकरमध्ये सूट मिळण्याची अपेक्षा होती मात्र कोणतीही सूट दिली गेली नाही. याउलट सर्व्हिस टॅक्समध्ये वाढ करून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्यात आली आहे. या देशातून गरिबी संपवू असे पंतप्रधान सांगत होते पण आजचा बजेट गरिबी नव्हे तर गरिबांना संपवणारा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. 
 
नवाब मलिक म्हणाले की, पैसे लावा, पैसे कमवा या प्रकारे कॉर्पोरेट क्षेत्राला सवलत देऊन सरकारने धनदांडग्यांना दिलासा दिला आहे. सरकारच्या जीडीपीची आकडेवारी फसवी असून या सरकारला खरेच गरिबांसाठी काय करायचे असते तर त्यांनी बीपीएलची मर्यादा 18 हजारांहून वाढवून 50 हजार करायला हवी होती मात्र सरकारने असे केले नाही. त्याचबरोबर आरोग्य विमा रक्कमेची मर्यादा वाढवून सरकारने आपल्यावरील जबाबदारी नागरिकांवर झटकण्याचे काम केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनरेगा हे संपुआ सरकारच्या अपयशाचे जिवंत स्मारक असल्याचे केलेल्या विधानाचा नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला. मनरेगा हे अपयशाचे स्मारक नसून देशाच्या विकासाचा आत्मा असल्याचे आजच्या अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावरून सिध्द झाले असे त्यांनी सांगितले.