शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जून 2015 (11:38 IST)

गूगलवर Father of Indian Navy सर्च करा, अभिमानास्पद उत्तर मिळेल!

‘फादर ऑफ इंडियन नेव्ही’ (भारतीय नौदलाचे जनक कोण?) असं गूगलवर सर्च करून पाहा.. हा मेसेज व्हॉट्स अँपवरील जवळपास प्रत्येक ग्रुपमध्ये येतो आहे. तेव्हा गूगलवर जाऊन हा प्रश्न सर्च केल्यास याचं उत्तर तितकंच स्फूर्तिदायक मिळतं. ज्याने आपली छाती अभिमानाने फुलून येते. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज!

होय! हे खरं आहे. गूगलवर तुम्ही ’Father of Indian Navy’ असं सर्च केल्यास तुम्हाला जवळपास प्रत्येक लिंकवर छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव दिसून येईल. त्यातही पहिली लिंक ही विकिपीडियाची दिसून येते. ज्यामध्ये 17व्या शतकात महाराजांनी आरमार उभं केलं असल्याचा उल्लेख आहे.

‘ज्याचा गड, त्याची जमीन’ आणि ‘ज्याचे प्रबळ आरमार त्याचा समुद्र,’ हा महाराजांच्या यशाचा मूलमंत्र होता. जमिनीप्रमाणेच समुद्रमार्गेही शत्रू तुमच्यावर चाल करून येऊ शकतो याच जाणिवेतून शिवाजी महाराजांनी पहिलं वहिलं आरमार 24 ऑक्टोबर 1657 मध्ये उभारलं होतं. या आरमाराचे दर्यासारंग (प्रमुख) हे दौलतखान होते. त्यांच्या आरमाराने बलाढ्य समजल्या जाणार्‍या शत्रूंनाही ‘सळो की पळो’ करून सोडले होते.

‘निश्चयाचा महामेरू’ असलेल्या शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून आरमाराची उभारणी केली होती. कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळील खाडीवर त्यांनी आपलं आरमार उभारलं होतं. महाराजांच्या आरमाराची दखल ही फ्रेंच आरामाराने देखील घेतली होती. त्या काळी महाराजांचे आरमार सर्वाधिक शक्तिशाली असल्याचेही त्यांनी मान्य केले होते.

नरपति, हयपति, गजपति । गडपति, भूपति, जळपति पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत या अवघ्या दोन ओळींमधून महाराजांच्या कार्याची ओळख होते. प्रचंड दूरदर्शीपणा ठेवून लष्करी पातळीवर महाराजांनी अनेक महत्त्वपूर्ण बदल केले होते. समुद्रावरील फिरते आरमार हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. आरमारासाठी लागणारी गलबतं आणि होड्या यासाठी वापरण्यात येणारी लाकडं ही परवानगीशिवाय तोडू नये, तसेच आंबा, वड यासारखी झाडं उपयुक्त असल्याने त्यांना कोणत्याही परिस्थितीत हात लावू नये असंही बजावण्यात आलं होतं. त्यामुळेच की काय गूगलवर देखील ’Father of Indian Navy’ असं सर्च केल्यास छत्रपती शिवाजी महाराज हे नाव समोर येत असावं.