गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 2 सप्टेंबर 2015 (11:34 IST)

गैरव्यवहारी १९ अधिकार्‍यांना ‘दे धक्का’

सार्वजनिकबांधकाम विभागाच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये वापरलेल्या साहित्याबाबतचे चाचणी अहवाल बनावट करून बिले सादर केल्याप्रकरणी राज्य सरकारने १९ अधिकार्‍यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वांद्रे व अंधेरी उपविभागात अधिकारी-कंत्राटदारांनी संगनमत करून कामांचे बनावट चाचणी अहवाल तयार केल्याचा हा प्रकार उघडकीस येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. २०११ ते २०१४ या चार वर्षांत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या २९ कामांमध्ये वापरलेल्या साहित्याबाबतचे चाचणी अहवाल नियमानुसार विभागाच्या प्रयोगशाळेने द्यावयास हवे होते.
त्याऐवजी बनावट अहवाल तयार करून बिले सादर करण्यात आली. पैसा उचलण्यात आला आणि शासनाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याची बाब समोर आली आहे.

महालेखापालांनी या साहित्य चाचणी अहवालांतील अनियमिततेवर बोट ठेवल्यानंतर विभागाच्या दक्षता व गुण नियंत्रण मंडळाने चौकशी करून शासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार बांधकाम साहित्याचे चाचणी अहवाल विभगाच्या तुर्भे येथील प्रयोगशाळेने दिलेच नसल्याचे स्पष्ट झाले.