शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

निवडणूक कार्यक्रम जाहीर

सासवड येथे होणा-या आगामी ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची अंतीम तारीख १७ ऑगस्ट, तर नावे मागे घेण्याची अंतीम तारीख २४ ऑगस्ट आहे. १६ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. अशी माहिती निवडणूक अधिकारी अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ.माधवी वैद्य उपस्थित होत्या. या निवडणुकीत अंदाजे बाराशे मतदार अध्यक्षपदासाठी मतदान करणार आहेत. अध्यक्षपद निवडणुक २०१३-१४ चा कार्यक्रम ३१ जुलैपासूनच सुरु झाला आहे. घटक, समाविष्ट, सलग्न, निमंत्रक संस्थाकडून मतदार याद्या महामंडळाकडे पोहचल्या आहेत. जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार निर्वाचन अधिका-याने अंतीम मतदार यादी जाहीर करण्याची तारीख ११ ऑगस्ट, मतदरांकडे मतपत्रिका पोस्टाने पाठविण्याची तारीख ४ सप्टेंबर, तर मतपत्रिका महामंडळाकडे पोहचवण्याची अंतीम तारीख १५ ऑक्टोबर आहे. १६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल. दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी साहित्य संमेलनाच्या मार्गदर्शक कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर म्हणजे १७ ऑगस्ट रोजी साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर केल्या जातील, असे डॉ.वैद्य यांनी सांगितले.

बॉक्स................

अध्यक्ष बिनविरोध झाल्यास स्वागतच

साहित्य महामंडळ पुण्यात आल्यापासून साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड बिनविरोध व्हावी, अशी महामंडळाची अपेक्षा होती. परंतु निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महामंडळाच्या पदाधिका-यांना बाजू मांडण्याचा हक्क नसतो. त्यामुळे या निवडणुकीकडे आम्ही तटस्थपणे पाहणार आहोत. मात्र जर अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली तर महामंडळाकडून त्याचे स्वागतच आहे. असे अ.भा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ.माधवी वैद्य यांनी म्हटले आहे.