शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2016 (17:39 IST)

पित्याच्या स्मारकासाठी ‘मातोश्री’ देण्याचे औदार्य नाही; ते लोकांची माफी काय मागणार?

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
 
दैनिक सामनातील वादग्रस्त व्यंगचित्रप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त करण्यास दिलेला नकार आश्चर्यजनक नाही. कारण वडील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी बाळासाहेबांचेच घर असलेले ‘मातोश्री’ देण्याचा मनाचा मोठेपणा उद्धव ठाकरे दाखवू शकले नाही; ते लोकांची माफी मागण्याची उदारता काय दाखवतील? अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
 
सामना व्यंगचित्रप्रकरणी आज गांधी भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले की, सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे. त्यामुळे या संदर्भात उद्धव ठाकरेंनीच माफी दिलगिरी व्यक्त करावी, एवढी साधी अपेक्षा मराठा समाज आणि महिला वर्गाकडून होती. परंतु केवळ व्यंगचित्रकाराच्या माफीनाम्यावर त्यांनी मराठा समाजाची आणि महिला वर्गाची बोळवण करण्याचा प्रयत्न केला. या व्यंगचित्रातून सैनिक, पोलीस व शहिदांच्या कुटुंबियांचाही अवमान झाला. तरीही या प्रकरणाचे गांभीर्य समजून घ्यायला उद्धव ठाकरे तयार नाहीत. माफी मागितल्याने माणूस लहान होत नाही, हे कदाचित उद्धव ठाकरेंना ज्ञात नसावे, असाही टोला त्यांनी लगावला.
 
शिवसेनेने विखे पाटील यांना विघ्नसंतोषी संबोधून टीका केली होती. या टिकेला उत्तर देताना ते म्हणाले की, व्यंगचित्र काढून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सामनाने करायचा आणि विघ्नसंतोषी आम्हाला ठरवायचे, हा दुटप्पीपणा आहे. शिवसेनेतील अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी या व्यंगचित्रावर नाराजी व्यक्त केली होती. मग् शिवसेनेतील ती मंडळी देखील विघ्नसंतोषी आहे का? अशीही विचारणा विरोधी पक्षनेत्यांनी केली. सामनातील व्यंगचित्रामुळे मराठा समाजात आणि शिवसेनेतील मराठा पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये ज्वालामुखी खदखदतो आहे. शिवसेनेने तो थोपवायचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्या ज्वालमुखीचा स्फोट शिवसेनेला फार काळ थांबवता येणार नाही. हा ज्वालामुखी आतून कमालीचा तापला असून, त्याचा स्फोट होऊन त्यात शिवसेना होरपळणार, असा इशारा विखे पाटील यांनी दिला.