बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :पुणे , बुधवार, 30 जुलै 2014 (14:30 IST)

पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळली; 160 जण अडकल्याची भिती

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर जवळील माळीण गावावर मोठी दरड कोसळली आहे. माळीण गावातील 50 ते 60 घरे या दरडीखाली अक्षरश: गाढली गेली आहेत. आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगार्‍याखाली 150 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
 

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील माळीण गावाजवळ आज (बुधवार) सकाळी सहा वाजेच्या सुमारास एक मोठी दरड कोसळली. यात सुमारे 40 घरे ढिगा-याखाळी अडकली आहेत. या घरांमधील सुमारे 150 जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. दरड कोसळल्याने गावात जाणारा रस्ता बंद झाला आहे. जेसीबी पोहोचण्यात अडचणी येत आहेत. प्रशासनाने याबाबात माहिती मिळताच त्वरीत एनडीआरएफचे पथक रवाना केले आहे.

दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून प्रचंड पाऊस पडत आहे. या पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे.