शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 2 सप्टेंबर 2014 (17:39 IST)

फाशी सुनावलेल्या दोषींच्या फेरविचार याचिकेवर पुन्हा सुनावणी

फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोषींच्या फेरविचार याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने मंगळवारी स्पष्ट केले. ही फेरविचार सुनावणी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये सुनावणी घेण्यात येईल, असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोषींना दिलासा मिळाला आहे.

सरन्यायाधीश आर.एम.लोढा यांच्या नेतृत्त्वाखालील घटनापीठामध्ये मंगळवारी याप्रकरणी एका याचिकेवर सुनावणी झाली. कोर्टाच्या या निर्णयामुळे 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमनसह त्याच्या अन्य सहकार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने मेमनसह अन्य दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या दोषींना आपले म्हणणे पुन्हा एकदा मांडण्याची संधी मिळणार आहे.

कोर्टाच्या न‍िर्णयानुसार, ज्या दोषींची फेरविचार याचिका यापूर्वी फेटाळण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या फाशीची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, ते सर्वजण सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा फेरविचार याचिका दाखल करू शकतात. त्यांच्या याचिकेवर तीन न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये सुनावणी घेण्यात येईल. यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोषींच्या फेरविचार याचिकेची सुनावणी न्यायाधीशांसमोर बंद खोलीत होत होती. मात्र, आता या स्वरुपाची फेरविचार याचिका दाखल केलेल्यांची सुनावणी खुल्या खोलीमध्ये घेण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.