बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 2 सप्टेंबर 2016 (17:18 IST)

बाप्पांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सध्या संपूर्ण राज्यात सुरु आहे. सुंदर, सुबक आणि देखण्या गणेशमूर्तींच्या बुकींगपासून सजावट आणि मखरीच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाली आहे.
 
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी त्यांच्या भक्तांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी नवी मुंबईमधील सर्वच बाजारपेठा फुलून गेल्या असून एपीएमसी मार्केटमध्ये सध्या बाप्पाच्या स्वागतासाठी सुंदर, शोभनीय मखरांच्या खरेदीचे काम जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतून बाप्पांची एक बारा फूट उंचीची मूर्ती ऑस्ट्रेलियाला पाठवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियात युनायटेड इंडियन असोसिएशन ही संघटना गणेशउत्सव साजरा करत आहे. यासाठी तिथल्या भाविकांनी ज्या मूतीर्शालेत लालबागचा राजा घडला, त्या बागवे आर्ट्सची निवड केली.
 
देखाव्यांची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी पुण्यातील विविध मंडळांचे कार्यकर्ते दिवस-रात्र झटत आहेत. भक्तांच्या स्वागतासाठी कमानी उभ्या राहिल्या आहेत. फुलांनी सजवलेल्या रथात, ढोल-ताशा आणि लेझीमच्या निनादात गणेशाची मिरवणूक काढण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. मानाच्या पाच गणेशमंडळांनीही जोरदार तयारी केली आहे.
 
बाप्पाचे आगमन थाटामाटात व्हावे, यासाठी शहरात ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. झेंडू, जास्वंद, कमळ या फुलांबरोबरच पंचखाद्य, मोदक, विद्युत रोषणाईच्या माळा, फुलांचे हार, आंब्याची पाने, नारळ, केवडा, शमी, दूर्वा, थर्माकॉलचे मखर, आरतीच्या सीडी यांच्या खरेदीसाठी मंडई, मार्केट यार्ड, बोहरी आळी परिसरात मंगळवारी अक्षरश: झुंबड उडाली होती. गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी शनिवारवाडा, मंडई, सारसबाग, डेक्कन, सदाशिव पेठ, टिळक रस्ता या भागात मोठी गर्दी होती. मूर्तींच्या किमती मागील वर्षीच्या तुलनेने यंदा काही प्रमाणात वाढल्याचे दिसून आले.