गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 25 मे 2016 (12:21 IST)

बारावीचा निकाल घटला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक  व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहिर झाला आहे. राज्याची निकालाची टक्केवारी 86.६० टक्के असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 93.29 टक्के तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ८३. ९९ टक्के लागला.
 
 राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत 18 फेब्रुवारी ते 28 मार्च 2016 या कालावधीत बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या 13 लाख 19 हजार 754 विद्यार्थ्यांपैकी 11 लाख 42  हजार 882 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या 5 लाख 32 हजार 482 असून मुलांची संख्या 6 लाख 10 हजार 400 एवढी आहे.
 
राज्य मंडळातर्फे बुधवारी (दि. 25) दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल प्रसिध्द केला जाईल. विद्यार्थ्यांना निकालाची मुळ प्रत येत्या 3 जून  रोजी दुपारी 3 वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात वितरित केली जाईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.