शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 23 जून 2015 (11:57 IST)

भुजबळांवर आता ‘ईडी’च्या धाडी

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई व परिसरातील दहा ठिकाणांवर केंद्रीय अर्थखात्याच्या अखत्यारीतील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्‍यांनी धाडी घातल्या. महाराष्ट्र सदन व राज्य मध्यवर्ती ग्रंथालय बांधकाम घोटाळ्याच्या प्रकरणात चौकशी व छाप्यांच्या गर्तेत आधीच भुजबळ अडकलेले आहेत. ‘ईडी’च्या विशेष पथकाने भुजबळ यांच्या मुंबईतील व आसपासच्या परिसरातील घरे व कार्यालयांवर छापे टाकले. 
 
‘ईडी’ने गेल्या आठवडय़ात भुजबळ यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराचे दोन गुन्हे दाखल केले आहेत. यातील पहिला गुन्हा महाराष्ट्र सदन बांधकाम व कालिना येथील भूखंड वाटपाचा असून, दुसरे प्रकरण नवी मुंबईतील गृहप्रकल्पांमध्ये करण्यात आलेल्या फसवणुकीसंबंधी आहे. त्याच अनुषंगाने ‘ईडी’ने 16 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यातून नेमके काय हाती लागले आहे, ते अद्याप कळू शकलेले नाही. भुजबळांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप पुन्हा एकदा फेटाळले आहेत. माझ्या विरोधात मीडियाला चुकीची माहिती पुरवली जात आहे. राजकीय शत्रूंकडून हे सगळे केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या आठवडय़ात राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर 16 ठिकाणी छापे टाकल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानेही आपली कारवाई अधिक वेगवान केली आहे. छगन भुजबळ यांच्याशी संबंधित मुंबई आणि परिसरातील विविध ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाकडून सोमवारी छापे टाकण्यात आले. मनिलाँडरिंग आणि ‘फेमा’ या दोन कायद्यांनुसार छगन भुजबळ यांच्याकडून गेल्या काही वर्षामध्ये करण्यात आलेल्या व्यवहारांचा तपास सक्तवसुली संचालनालय करते आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.