गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नवी मुंबई , सोमवार, 26 सप्टेंबर 2016 (10:39 IST)

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका - मुख्यमंत्री

मराठा समाज हा मोठा समाज आहे आणि त्या समाजात अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तर मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असं आमच्या सरकारचे स्पष्ट मत असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केली आहे.
 
नवी मुंबईत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत विविध उपक्रम राबवण्यासाठी २०० कोटी रुपये दिले जातील अशी घोषणाही त्यांनी याप्रसंगी केली.
 
 सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत. स्वंतत्र्य भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचे मोर्चे निघाले आहेत. या मोर्चांचे स्वरुप मुक असले, तरी त्याचा आवाज मोठा आहे. याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे आम्ही मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यास कटिबद्ध आहोत असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे.
 
मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा धक्का दिला मी किती दिवस मुख्यमंत्री राहीन याची मला पर्वा नाही. पण जेवढे दिवस राहीन परिवर्तनासाठी काम करेन असे धक्कादायक विधान त्यांनी केले.
 
फक्त मोर्चे काढून होणार नाही तर सरकार सोबत येऊन आयोजकांनी चर्चा करणे गरजेचे आहे. द्ब्सव तयार करायचा आणि निर्णय घेतेवेळी वेळ नाही द्यायचा असे होऊ न देता आयोजकांना भिजत घोंगडं ठेवू नका, असे आवाहन करतानाच, राज्य सरकार मराठा समाजासोबत आहे. त्यासाठी निर्णायक निर्णय घेण्याची सरकारची तयारी आहे. या निर्णयासाठी आम्हाला चर्चा करायची आहे. कारण थेट निर्णय जाहीर करता येत नाही. त्यामुळे आपल्याला एकत्र येऊन चर्चा करावी लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.
 
तसेच कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी व्हायला पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. यासाठी हे प्रकरण उज्वल निकम यांच्याकडे दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.