शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

मराठीच्या आग्रहासाठी राज यांचा 'खलिता'!

ND
ND
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीचा गजर बुलंद करण्याचे ठरविले आहे. २७ फेब्रुवारीला होणार्‍या मराठी दिनानिमित्त राज यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहिणार असून त्यात दैनंदिन आयुष्यात 'यत्र तत्र सर्वत्र' मराठीचाच वापर करण्यास 'बजावले' जाणार आहे.

हे पत्र मनसेच्या कार्यकर्त्यांमार्फत घरोघरी पोहोचविले जाणार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन राज्यात मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे मराठीचा गजर बुलंद करण्यासाठी राज यांना यापेक्षा चांगला मुहूर्त सापडणे शक्य नव्हते. त्यामुळे ही संधी ते साधणार आहेत.

यात पत्रात राज सर्व मराठी जनतेला त्यांच्या घरात, बाहेर, ऑफिसांत, रेल्वेगाड्यांत मराठीचाच वापर करावा असे आवाहन करणार आहेत. शिवाय मराठीसाठी आपल्या लोकांनीच आग्रही रहावे असे ते बजावणार आहेत.

विशेष म्हणजे हे पत्र फक्त मराठी घरांत जाणार असे नाही. तर राज्यातील अमराठी जनतेच्या घरातही ते जाणार असून मराठीच्या आग्रहाबाबतीत राज 'भेदभाव' करण्याच्या मनस्थितीत नाहीत. राज यांच्या या आवाहनावरून गदारोळ उठण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः अमराठी लोक या राजपत्राबाबत काय भूमिका घेतील हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.