मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 22 मे 2015 (13:07 IST)

महानंद दुधाचे दर कमी होणार

दुधाच्या वाढत्या किमतीमुळे त्रासलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दुग्धव्यवसायमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये खासगी दूध उत्पादकांच्या दुधाच्या दरावर नियंत्रण ठेवणारा कोणताही कायदा नाही, अशी कबुली देतानाच महानंद दुधाचे दर दोन ते पाच रुपयांनी कमी करण्याचा सरकार नक्कीच विचार करेल, अशी ग्वाही खडसे यांनी दिली.
 
मंत्रालयातील आपल्या दालनात एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दूध उत्पादक संस्था शेतकर्‍यांकडून 12 ते 16 रुपयांपर्यंत दूध खरेदी करतात आणि हेच दूध ते 40 ते 50 रुपये लिटरप्रमाणे विकतात. हा शेतकर्‍यांवर अन्याय असून शेतकर्‍यांकडून 20 रुपये दरानेच दूध विकत घेण्याच्या त्यांना सूचना केल्या आहेत, असे खडसे यांनी सांगितले.
 
अतिरिक्त दुधापासून पावडर तयार केली जाते. पण या भुकटीला चांगला भाव मिळत नसल्याने सरकार आणि उत्पादक अडचणीत आले आहेत. त्यामुळे अतिरिक्त भुकटीपासून तयार केलेले दूध शालेय पोषण आहाराअंतर्गत शाळांमधील विद्यार्थी तसेच अंगणवाडीमधील मुलांना दिले जाणार आहे. यासंदर्भात मुख्यमंर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला असून 1 जूनपासून भुकटीपासून तयार केलेल्या दुधाचे वाटप होणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.