शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 सप्टेंबर 2016 (10:26 IST)

माता भगिनींचा अवमान करणार्‍या शिवसेनेने माफी मागावीः अशोक

मराठा आरक्षणासारख्या गंभीर विषयाची टिंगलटवाळी करून या मोर्चात सहभागी लाखो माता भगिनींचा व्यंगचित्र काढून अवमान करणा-या शिवसेनेचा निषेध करित, शिवसेनेने जाहीर माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
 
गांधीभवन येथे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चव्हाण यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी सकल मराठा समाजाचे लाखोंचे मूक मोर्चे निघतायेत, अत्यंत शिस्तीने आणि शांततेने लाखो लोक या मूक मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्या सरकारकडे पोहोचवत आहेत. राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेनेने या मोर्चाची गंभीर दखल घेऊन कारवाई करणे अपेक्षित असताना,शिवसेना व्यंगचित्र काढून मराठा समाजाची टिंगल करते आहे,राज्यभरात निघणारे सकल मराठा समाजाचे मोर्चे हा टिंगलीचा विषय नाही असे चव्हाण यांनी शिवसेनेला खडसावले.
 
राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही. मराठा समाजाच्या प्रत्येक ठिकाणी निघणा-या मोर्चात 15 ते20 लाख लोक सहभागी होत आहेत. हे विराट मोर्चे पाहून सरकार गोंधळलेले आहे. मंत्रीगट स्थापून जिल्ह्या-जिल्ह्यात चर्चा करण्याचा निर्णय हा सरकारचा वेळकाढूपणा आहे. मराठा आरक्षणाबाबत अभ्यासगट,समित्या, उपसमित्या, चर्चा हे सर्व यापूर्वीच झाले आहे. आता सरकारने न्यायालयात नीट बाजू मांडावी आणि आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असे चव्हाण म्हणाले. फक्त मराठा आरक्षणाबाबतच नाही तर हे सरकार मुस्लीम आरक्षणाबाबतही चालढकल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांना व्होट बँक समजू नका, त्यांना आपलेसे करा असे म्हटले आहे. राज्य सरकारने विरोधकांचे नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ऐकून तरी मुस्लीम समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.