मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मान्सून यंदा एक जूनपूर्वी, राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के जास्त पाऊस

पुणे- यंदा मान्सून 1 जूनपूर्वीच केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज ‘स्कायमेट’ संस्थेने वर्तविला आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यातील उन्हाच्या झळांची तीव्रता फार दिवस राहणार नाही.
 
जून ते सप्टेंबरदरम्यान पडणारा नैर्ऋत्य मौसमी पाऊस दरवर्षी साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये येतो. मात्र, यंदा जूनच्या आधीच वरुणराजा हजेरी लावेल असे सांगण्यात आले आहे. सुरुवातीला मान्सून हजेरी लावताना अंदमान आणि निकोबार बेटांचा भाग व्यापून टाकेल. 18 ते 20 मे दरम्यान या भागात मान्सूनचे आगमन होईल. तर, केरळमध्ये 28 ते 30 मे यादरम्यान मान्सूनच्या सरी येतील. तसेच, ईशान्य भारताचा
प्रदेशही यावेळी मान्सून व्यापून टाकेल, असे ‘स्कायमेट’ने म्हटले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग मान्सूनबद्दलचा आपला अंदाज 15 मे रोजी जाहीर करणार आहे. मान्सूनच्या प्रगतीचा अंदाज 15 मे रोजी जाहीर केला जाईल, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी 4 मे रोजी (बुधवारी) सांगितले. लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली.
 
दुष्काळात होरपळून निघत असलेल्या मराठी जनतेला दिलासा देणारी एक चांगली बातमी आहे. महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा 27 टक्के जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामान खात्याचे विभागीय उपसंचालक कृष्णानंद होसलीकर यांनी पावसाच्या अंदाजाबद्दल माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन सुसज्जतेबाबत ठाणे जिल्हा मुख्यालयात एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.