शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , शनिवार, 2 ऑगस्ट 2014 (10:42 IST)

माळीण गावाच्या पुनर्वसनासाठी सरसावले मुंबईतील डबेवाले!

पुणे जिल्ह्यातील माळीण गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 63 वर पोहोचला आहे. राज्य सरकारने प्रत्येक मृत्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यापूर्वी केंद्र सरकरने दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माहिती दिली. राज्यातून मतदीचा ओघ सुरु आहे. दुसरीकडे माळीण गावच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील डबेवाले सरसावले आहेत. माळीणसाठी त्यांनी एक अनोखी मोहिम सुरु केली आहे.
 
डबेवाले आजपासून प्रत्येक डब्यात मदतीचे  आवाहन करणारी चिट्ठी ठेवणार आहे. जवळपास दोन लाख ग्राहकांपर्यंत चिठ्ठी पोहोचेल. त्याच बरोबर दहीहंडी फोडून मिळणारी रकमही माळीण गावाच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणार आहे.
 
दरम्यान, या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरीकांना राज्य शासनातर्फे दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच मोफत उपचारही केला जाणार आहे. आतापर्यंत 63 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यात चार लहान मुले आणि 14 महिलांचा समावेश आहे. अजून शेकडो लोक ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.