गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2016 (17:11 IST)

मुक्त विद्यापीठाच्या कृषीविज्ञान केंद्राचे कार्य कौतुकास्पद

कृषीविज्ञान केंद्राचे क्षेत्रीय संचालक डॉ. वाय जी प्रसाद यांचे गौरोदगार
अत्याधुनिक शेती करतानाच क्षेत्रानुसार नवीन पिक पद्धतीचे तंत्र अवगत करून देण्यासाठी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषीविज्ञान केंद्राचे कार्य कौतुकास्पद आहे. या केंद्रामुळे विशेषतः राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांना एकात्मिक शेतीविषयक मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत आहे, असे गौरोदगार कृषीविज्ञान केंद्राचे क्षेत्रीय संचालक डॉ. वाय जी प्रसाद यांनी काढले. 
 
मुक्त विद्यापीठाच्या कृषीविज्ञान केंद्रामार्फत चाकोरे (त्र्यंबकेश्वर) येथे राबविण्यात येत असलेल्या एकात्मिक शेती अंतर्गत विविध उपक्रमांची पाहणी डॉ. वाय जी प्रसाद यांनी नुकतीच केली. या भेटीत त्यांनी या वेळी चारसूत्री भात लागवड, नागली नवीन वाणाची प्रात्यक्षिके तसेच पर्यायी पीक आणि पडीक जागेच्या योग्य वापरास आंबा लागवड, उसात बटाटा आंतरपीक, लसूण पिकाची नवीन फुले नीलिमा जात, कांदा लागवड तंत्र, भाजीपाल रोपवाटिकेत कीडरोधक जाळीचा वापर, सुधारित अवजारे वापर, महिलांसाठी छोटे उपयुक्त यंत्रांचा वापर, गिरीराजा कोंबडी पालन, उस्मानाबादी नरातून शेळी सुधार, फुले जयवंत चारा लागवड, माती परीक्षणाद्वारा खत वापर, जमीन आरोग्य पत्रिका अशा विविध तंत्रांचा वापर पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. कृषी विज्ञान केंद्राच्या भारत हैदराबाद विभागीय कार्यालयाचे संचालक डॉ. वाय.जी. प्रसाद यांनी नुकतीच विविध उपक्रमांची पाहणी करण्यास भेट दिली. यावेळी डॉ. राजेंद्र रेड्डी हेदेखील उपस्थित होते. अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकात्मिक शेतीतून शाश्वत उत्पन्नातून त्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे सांगून कृषीविज्ञान केंद्राच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. 
 
डॉ. प्रसाद यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. महिला आणि पुरुष शेतकऱ्यांनी उस्फुर्त भाग घेऊन चर्चेद्वारा त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान महिलांनी कृषीविज्ञान केंद्रामार्फत पुढील काळात दीर्घकालीन व्यावसायिक प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या प्रशिक्षणाबरोबरच पिण्याचे पाणी आणि नाल्यावर छोटा पूल असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच शेताची काही कामे एकाच वेळी येत असल्याने मजूर कमतरतेवर काही आधुनिक उपाय गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कृषीविज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील यांनी केंद्रामार्फत स्वयंचलित भात कापणी यंत्र, वाहतुकीला सोपे पोर्टेबल भात मळणी यंत्र आणि छोटी राईस मिल यांची प्रात्याक्षिके घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. या भेटीत डॉ. प्रसाद आणि कृषीविज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन विविध प्रत्याक्षिकांना भेट देऊन पाहणी करून, येत्या दोन ते तीन वर्षात या गावातील विविध उपक्रमास पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कृषीविज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. राजाराम पाटील, प्रा. हेमराज राजपूत, डॉ. नितीन ठोके, डॉ. प्रकाश कदम, सौ. अर्चना देशमुख, डॉ. श्याम पाटील, मंगेश व्यवहारे आदींनी सहभाग घेतला. चाकोरे गावचे माजी सरपंच जगन आचारी, सौ. विमल आचारी आणि इतर ग्रामस्थांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. 
 
डॉ. प्रसाद यांनी एकात्मिक शेतीस उपयुक्त तंत्रांसह असलेल्या केंद्राच्या प्रक्षेत्रासही भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रक्षेत्रावर अति घनता, आंबा, पेरू, चिकू, नारळ, फणस, आवळा लागवड आणि द्राक्ष लागवड यांची पाहणी केली. त्याचप्रमाणे शेतीपूरक व्यवसाय म्हणून गिरीराजा, कडकनाथ कोंबडीपालन, उस्मानाबादी शेळी पालन, गांडूळ खत उत्पादन, रोपवाटिका, संरक्षित शेती या प्रात्यक्षिकांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.