शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राणीच्या बागेत पेंग्विन

मुंबई- पांढर्‍या शुभ्र बर्फामध्ये तुरूतुरू चालणार्‍या सुबक ठेंगण्या पेंग्विनबद्दल सगळ्यांना लहानपणापासून आकर्षण वाटत असते. हे पेंग्विन ‘याचि देहि याचि डोळा’ पाहण्याची संधी आता मुंबईकरांना मिळणार आहे. भायखळ्यातील जिजामाता उद्यानात, अर्थात राणीच्या बागेत सात पेंग्विनचे आगमन झाले असून त्यांच्या निवासाची उत्तम व्यवस्था इथे करण्यात आली आहे.
 
राणीच्या बागेत पेंग्विन आणण्याची चर्चा बरेच दिवस सुरू होती. त्याला प्राणिप्रेमींनी विरोधही केला होता. आपल्याकडचे वातावरण त्यांना पूरक नसल्याने ते धोक्याचे ठरू शकते, याकडे लक्ष वेधत त्यांनी निदर्शनेही केली होती. परंतु, पेंग्विनना कुठलाही त्रास होणार नाही, याची हमी देत आज व्यवस्थापनाने सात पेंग्विनचे उद्यानात स्वागत केले.
 
हॅमबोल्ट जातीची ही पेंग्विन कोरियाहून आठ तासांचा प्रवास करून मुंबईत पोहोचली. त्यापैकी दोन नर आणि पाच माद्या आहेत. त्या सर्वाचे वय दोन ते तीन वर्षे आहे. त्यांना मुंबईतील वातावरणाची सवय होण्यासाठी दीड महिना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवले जाणार असल्याची माहिती उद्यानाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
 
या पेंग्विनची किंमत दोन कोटी रुपये असल्याचे समजते. परंतु, त्यांच्यामुळे राणीच्या बागेला नवचैतन्य येण्याची शक्यता आहे. गरज आहे, ती त्यांच्या योग्य काळजी घेण्याची, व्यवस्थित निगा राखण्याची.