गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

राणेंच्या मते, शेतकरी आत्महत्यांमागे दारूचे व्यसन

विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना आर्थिक कारणांबरोबरच काही सामाजिक समस्याही कारणीभूत आहेत. दारूचे व्यसन हे त्यातील प्रमुख कारण आहे. त्यामुळे विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करावी, अशी मागणी महसूलमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी महसूलमंत्र्यांनी अमरावती महसूल विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. त्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या व आत्महत्या रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला होता.

कर्जबाजारीपणा व आर्थिक अडचणींबरोबरच काही सामाजिक समस्याही आत्महत्यांना कारणीभूत असल्याने महसूलमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशीम, अमरावती या ५ जिल्ह्यात तसेच दारूबंदी असतानाही दारूचे पिणार्‍यांचे प्रमाण अधिक असलेल्या वर्धा जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करावी, अशी मागणी केली आहे. कारण या सहा जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे.