गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोलापूर , सोमवार, 18 जानेवारी 2016 (10:40 IST)

विष्णुपंत कोठे यांचे निधन

सोलापूरच्या राजकारणातील एकेकाळचे किंगमेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ व मुरब्बी राजकीय नेते, कुशल संघटक, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे विश्वासू सहकारी व अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे आधारवड विष्णुपंत गणपतराव कोठे (वय 80) यांचे रविवारी सकाळी झोपेतच हृदविकाराचा झटका येऊन निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रात्री पुणे नाका स्मशानभूमीत रात्री 10.30 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्संस्कार करण्यात आले.
 
कोठे यांच्यावर 2008 मध्ये बायपास सर्जरी झाली होती. त्यांची प्रकृती नाजूक झाल्यामुळे व हृदयाची क्षमता कमी झाल्यामुळे त्यांना    उपचारासाठी पंधरा दिवसांपूर्वी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी उपचारानंतर ते सोलापुरात परत आले. शनिवारी रात्री घरातील कुटुंबीयांसमवेत गप्पाही मारल्या होत्या. 
 
रविवारी पहाटे त्यांना जाग आली व थोडय़ावेळाने ते पुन्हा झोपले. सकाळी ते नेहमी लवकर उठत असत. सकाळचे आठ वाजले तरी ते झोपेतून न उठल्याने त्यांची सुश्रुषा करणारे अप्पा अंदेवाडी यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टर अरुण बाकळे यांना मुरारजी पेठेतील ‘राधाश्री’ बंगल्यावर बोलाविले, परंतु डॉ. बाकळे यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर झोपेतच हृदविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाल्याचे स्पष्ट केले. हे वृत्त समजताच शहरातील सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांनी, नगरसेवकांनी, कार्यकर्त्यांनी व शहरातील मान्यवर व्यक्तींनी येऊन त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून अंत्यदर्शन घेतले.