गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 नोव्हेंबर 2015 (09:32 IST)

शनी दर्शन प्रकरणी सातजण निलंबित

अहमदनगर- जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या शनी शिंगणापूर इथल्या शनी मंदिरातील चौथर्‍यावर चढून एका एका महिलेने शनी देवाचं दर्शन घेतल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. त्यामुळे ग्रामस्थांनी शनी देवस्थान विश्वस्त मंडळाच्या विरोधात संताप व्यक्त करत आज (रविवारी) शनी शिंगणापूर बंदची हाक दिली होती. ग्रामस्थांच्या विरोधामुळे घटनेवेळी चौथार्‍यावर साफसफाई करणारे तिघे जण तसंच चार सुरक्षा रक्षक असं एकूण सात जणांना देवस्थानाने निलंबित केलं आहे. त्यानंतर बंद मागे घेण्यात आला आहे. त्यानंतर शनी मूर्तीला दुग्धाभिषेक घालून महाआरती करण्यात आली.
 
देवस्थानाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी स्त्री चौथर्‍यापर्यंत पोहचल्याचं म्हटलं जात आहे. शनी मंदिरातील चौथर्‍यावर महिलांना जाण्यास बंदी असतानाही एका युवतीने चौथर्‍यावर चढून तेल वाहून शनी देवाचं दर्शन घेतलं. ही घटना काल शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. त्यावेळी हजारो भाविक यावेळी तिथे उपस्थित होते. तसंच सुरक्षारक्षकांनीही हा घडलेला प्रकार पाहिला. या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी युवतीची अर्धा तास चौकशी केली आणि तिला सोडून दिलं. मात्र, त्यानंतर शनी शिंगणापुरामध्ये राजकीय वातावरण तापलं. सुरक्षा यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे हे घडल्याचा आरोप स्थानिकांनी केल्याने सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आलं.
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केरळच्या शबरीमाला मंदिरात मासिक पाळी सुरू असणार्‍या महिलांना प्रवेशास बंदी घालण्यासाठी स्कॅनर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सोशल मीडियावर यानिर्णयाचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर आता शनिशिंगणापुरमध्ये महिलेने केलेल्या या बंडामुळे देवदर्शन आणि महिला हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित महिला पुण्याहून आली असून तिने जाणूनबुजून हे कृत्य केले की अनवधानाने याबाबत खुलासा झालेला नाहीये. दर्शन घेताच ती महिला तातडीने तेथून निघून गेली होती.