शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई (रुपेश दळवी) , शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2015 (14:37 IST)

शिवकालीन शस्त्रास्त्रांचं अनोखे प्रदर्शन

दिवाळी आली कि बाळ गोपाळामध्ये आवड लागते ती शिवकालीन किल्ले बनविण्याची. सोबतच किल्ल्यांत मावळे आणि त्यांची शस्त्रासत्रे दाखविण्याची. राजाची शस्त्रास्त्रे वेगळी, राणीची वेगळी अन् राजकुमाराची लहान आकारातील शस्त्रास्त्रे वेगळी. युद्धात वापरली जाणारी वेगळी आणि नजराणा म्हणून सन्मानपूर्वक दिली जाणारी नक्षीदार शस्त्रास्त्रे वेगळी. ही सर्व वैविध्यपूर्ण शस्त्रास्त्रे पाहतानाच त्यांच्या अनोख्या इतिहासाचा पट चारकोप कांदिवली येथील ज्ञानवर्धिनी विद्यालय व माजी विद्यार्थी संघ आयोजित शिवकालीन दुर्मीळ शस्त्रास्त्र भव्य प्रदर्शन सोहळाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. 
 
ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या पटांगणात चारकोप सेक्टर ७, चारकोप बस डेपो च्या मागे ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रदर्शन आयोजित केले आहे. शिवकालीन शस्त्रास्त्र (प्रतिकृती) बरोबर ऐतिहासिक स्वातंत्र्यकालीन व मोडी लिपीतील पत्रांचे सुद्धा भव्य प्रदर्शन त्यात पाहता येणार आहे.
 
सदर प्रदर्शन हे शिवकालीन जुनी वापरात नसलेली व केवळ अभ्यासासाठी संग्रहित केलेली ऐतिहासिक शस्त्रे, वस्तू, चित्रे, माहितीपर तक्ते आणि शिवकालीन नाणी यांचे आहे. सुप्रसिद्य इतिहास अभ्यासक, मोडी लिपी तज्ञ श्री सुनील कदम (बदलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली या वैयक्तित वस्त्रू संग्रहाचे प्रदर्शन होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना आपल्या महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहासाविषयी माहिती व अमुल्य मार्गदर्शनाचा लाभ व्हावा व या दुर्मिळ वस्तू प्रत्यक्ष पाहता याव्यात हाच या उपक्रमाचा उद्देश आहे. 
             
प्रदर्शनाचे उद्गाटन सकाळी ९.००  वाजता इतिहास अभ्यासक अप्पा परब यांच्या हस्ते तर सांगता सोहळा सायंकाळी ५.३० वाजता इतिहास अभ्यासक रविराज पराडकर यांच्या शिवचरित्र 'फत्ते : खानाची स्वारी' या व्याख्यानाने होणार आहे. सदर कार्यक्रमास शिवरुद्राचे दिग्विजय तांडव, या कार्यक्रमाचे प्रमुख श्री अनिल नलावडे व पद्मश्री राव यांची उपस्थिती लाभणार आहे. ह्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक काशिनाथ तळपाडे व माजी विद्यार्थी संघटनेने केले आहे.