शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , बुधवार, 29 ऑक्टोबर 2014 (10:10 IST)

शिवसेना सत्तेबाहेरच ?

शिवसेनेबरोबर चर्चा सुरू आहे, लवकरच सुखद निर्णय समोर येईल, असे भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणत असले तरी कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घ्यायचे नाही, असे भाजपने ठरविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळीच आमचे सरकार बहुमत सिद्ध करेल. इतर पक्षांचे 27 आमदार भाजपमध्ये येण्यास एका पायावर तयार आहेत, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
 
पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर बोलताना भाजप नेते जे. पी. नड्डा म्हणाले की, येत्या 31 ऑक्टोबरला फडणवीस यांचे छोटेखानी मंत्रिमंडळ शपथ घेईल. शिवसेनेबरोबर आमची चर्चा सुरू आहे, त्यातून काही सुखद निर्णय निघेल. चर्चा लांबत असल्यामुळे सध्या छोटेसे मंत्रिमंडळ शपथ घेईल. नड्डा यांच्या या वक्तव्यानंतर विनोद तावडे यांनीही त्याची री ओढली. आमची चर्चा सुरू आहे, 31 ऑक्टोबरपर्यंत आणखी दोन दिवसांचा वेळ आहे, असे ते म्हणाले. पण सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेला नुसते झुलवत ठेवायचे आणि सत्तेत सहभागी करून घ्यायचे नाही, असे भाजपने ठरविले आहे. केंद्रीय कृषिमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्यावर चर्चेची औपचारिकता पूर्ण करण्याची जबाबदारी टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सरकारला येत्या 15 दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.
 
फडणवीस यांच्याबरोबर एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे असे सहा जण मंत्रिपदाची शपथ घेतील. आदिवासी तसेच मागासवर्गीयातील एका मंत्र्याच्याही यावेळी शपथविधी होणार असल्याचे कळते. इतर पक्षांतून आलेले तसेच मित्रपक्षांच्या सदस्याला यावेळी शपथ दिली जाणार नसल्याचेही समजते. केंद्र सरकारप्रमाणे राज्यातही छोटे मंत्रिमंडळ ठेवण्याचा विचार फडणवीस यांचा असल्याचे सूत्रांनी सांगितले.