शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 सप्टेंबर 2015 (10:18 IST)

शीनाची हत्या झाली; अखेर इंद्राणीची कबुली

मुंबई- शीना जिवंत आहे आणि ती अमेरिकेत राहत आहे, असा दावा करणार्‍या इंद्राणी मुखर्जीने अखेर शीनाची हत्या झाल्याचे मान्य केले आहे, अशी माहिती तपास पथकातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. शीनाच्या हत्येत आपला हात होता, अशी कबुली देणार्‍या इंद्राणीने हत्येचा उद्देश मात्र सांगितलेला नाही, असे हा अधिकारी म्हणाला.
 
गेल्या आठवड्याभरापासून इंद्राणी मुखर्जी पोलीस कोठडीत असून या दरम्यान तिची मॅरेथॉन चौकशी करण्यात आली आहे. इंद्राणीचा आधीचा पती संजीव खन्ना आणि ड्राव्हर श्याम राय यांनी गुन्ह्याची कबुली दिली तरी इंद्राणी मात्र सतत पोलिसांना दिशाभूल करणारी उत्तरे देत होती. आता मात्र इंद्राणीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याने तपासाला वेग मिळेल, असे या पोलीस अधिकार्‍याने सांगितले. शीनाच्या हत्येत आपला सहभाग असल्याचे कबूल करणार्‍या इंद्राणीने मिखाईलच हत्येचा कट रचल्याचा आरोप मात्र फेटाळला आहे, असेही या अधिकार्‍याने स्पष्ट केले.
 
इंद्राणीला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी आहे. त्यामुळे या घटनेच्या मुळाशी जाण्यास आम्हाला मदत होईल. इंद्राणी, खन्ना आणि राय या तिन्ही आरोपींची गुन्ह्यातील नेमकी भूमिका का होती, हे आम्ही स्वतंत्रपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही या अधिकार्‍याने सांगितले.