शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 4 मार्च 2015 (14:48 IST)

श्रेष्ठींविरुध्द राणे गरजले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाविरोधात पावले उचलण्यास सुरुवात केली असून काही आमदार आणि पक्ष पदाधिकार्‍यांबरोबर त्यांनी मुंबईत चर्चा केली. त्यांच्या भेटीसाठी सिंधुदुर्गातून अनेक काँग्रेसचे पदाधिकारी खास मुंबईत आले होते. काँग्रेसचे काही आमदारही राणेंना भेटले.
 
दिल्लीतून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाणांची तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून संजय निरुपम यांच्या नियुक्ती घोषणा केली. नारायण राणेंनी तत्काळ त्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले होते की, मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकरच येणार आहेत त्या पाश्र्वभूमीवर 
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मराठी नेत्याकडे देणे गरजेचे होते.
 
अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांच्यातील वैर जुनेच आहे. 2008 मध्ये कै. विलासराव देशमुखांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले गेले तेव्हा नारायण राणेंनी बंड पुकारले होते आणि पक्षश्रेष्ठींच्या विरोधात जाहीर आगपाखड केली होती. काल चव्हाण आणि निरुपम यांच्या विरोधात राणे यांनी त्याच पद्धतीने मतप्रदर्शन केले. काल रात्रीपासूनच नारायण राणेंनी काँग्रेसच्या विविध आमदार व पदाधिकार्‍यांबरोबर संपर्क सुरू केला होता.
 
आज दुपारी नरिमन पॉईंट येथील खासगी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले की, मी पक्षाच्या निर्णयाविरोधात नाराज नाही, पण महाराष्ट्राबाबतचे व मुंबईबाबतचे पक्षाचे निर्णय करताना येथील निर्णयांबाबत पक्षाने आधी चर्चा करणे गरजेचे होते, असे माझे म्हणणे आहे. तशी प्रथा काँग्रेसमध्ये नाही असे काही नेते मला सांगतात पण तशी प्रथा नसेल तर सुरू करा, हेच माझे म्हणणे आहे. राणे आज रात्री चीनच्या खासगी दौर्‍यावर निघाले असून ते पुढच्या रविवारी रात्री उशिरा परत येणार आहेत. ते म्हणाले की, मी परत आल्यानंतर मला आणखी काही लोकांशी बोलायचे आहे. काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी काय करावे याचा विचार पक्षाने करणे गरजेचे आहे. सध्या ज्या पद्धतीने निर्णय होत आहेत त्याने जनतेचे समर्थन वाढेल असे वाटत नाही. मी परदेशातून परत आल्यानंतर पुढच्या वाटचालीबाबत सर्वाशी चर्चा करून मग मी काय तो निर्णय करणार आहे.