गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 6 मे 2015 (10:55 IST)

सहा महिन्यात महायुतीचे तुकडे?

निवडणुकीआधी ‘हम साथ साथ है’ म्हणत भाजपच्या हातात हात घालून एकत्र आलेल्या शेट्टी, जानकर आणि मेटेंची आता घुसमट होऊ लागली आहे. मंत्रिपदाची आश्वासने खोटी ठरली. सरकार चालवताना कुणी विचारेनासे झाल्याने आता मोठा निर्णय घेण्याची तयारी या तीनही मित्रांनी केली आहे. ज्यासाठी 12 तारखेला बैठक होणार आहे.
 
काँग्रेस-राष्ट्रवादीला धूळ चारुन सत्तेत आलेल्या महायुतीचे सहा महिन्यातच तुकडे पडण्याची चिन्हे आहेत. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते फडणवीस आणि टीमवर नाराज आहेत.
 
शेट्टींचे सहकारी सदाभाऊ खोत यांना विधानपरिषद देण्याचे आश्वासन दिले होते. ऊस आणि कापूस उत्पादकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू असेही फडणवीस म्हणाले होते. पण भाजप आणि फडणवीसांनी यातले एकही आश्वासन पूर्ण केले नाही.
 
फडणवीसांच्या काळात गारपीट आणि अवकाळीने शेतकरी बेजार झाला. मात्र, त्याची भरपाई किंवा मदत शेतकर्‍याला मिळाली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचा रोष वाढतो आहे. अशा स्थितीत फक्त भाजपसोबत असल्याने शांत बसणे शेट्टींना परवडणार नाही. शिवसंग्रामच्या विनायक मेटेंना फडणवीसांनी विधानपरिषदेवर पाठवले. पण मेटेंना मंत्रिपदाची आस लागली आहे. ज्यावर फक्त चालढकल होतेय अशी भावना आहे. मित्रपक्षांना सरकारच्या निर्णयांमध्ये फारसे स्थान नसल्याने मेटे अस्वस्थ आहेत. त्यात मराठा आरक्षण कोर्टाने रद्दबातल ठरवल्याचेही खापर भाजप सरकारवर फुटते आहे. जे मेटेंसाठी अडचणीचे झाले आहे.