मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 मार्च 2017 (09:44 IST)

२०१६-१७ चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. सन २०१६-१७ या वर्षीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे किशोर नांदलस्कर (नाटक), पं. उपेंद्र भट (कंठसंगीत), पं. रमेश कानोले (उपशास्त्रीय संगीत), भालचंद्र कुलकर्णी (मराठी चित्रपट), पांडूरंग जाधव (कीर्तन) , मधुकर बांते (तमाशा), शाहीरी इंद्रायणी आत्माराम पाटील (शाहिरी),  सुखदेव साठे (नृत्य), भागुजी प्रधान (लोककला),  सोनू ढवळू म्हसे (आदिवासी गिरीजन) आणि  प्रभाकर भावे (कलादान).
 
सन २०१६-१७ या वर्षीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान सोहळा दि. ०४ मार्च २०१७ रोजी रविंद्र नाट्य मंदिर येथील कलांगण, प्रभादेवी मुंबई येथे सांय. ६ वाजता सांस्कृतिक कार्यमंत्री  विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, स्नेहल आंबेकर, खासदार राहूल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, यांच्या प्रमुख उपस्थिती असणार आहे.
 
नाटक, कंठसंगीत उपशास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, मराठी चित्रपट, कीर्तन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप रुपये एक लाख रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल असे आहे. तसेच यावेळी संगीत नाटक अकादमीचे मानकऱ्यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी या पुरस्कार सोहळ्यास आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित “महाराष्ट्राची गौरव गाथा” या सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सांस्कृतिक कार्य  संचालनालयाने केले आहे.