गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. प्रजासत्ताक दिन
Written By वेबदुनिया|
Last Updated : गुरूवार, 17 जानेवारी 2019 (12:16 IST)

भारत किती सुरक्षित?

स्वातंत्र्याच्या मोबदल्यात भारताचे विभाजन स्वीकारावे लागले. पण त्यानंतरही काश्मीरचा लचका पाकिस्तानने घेतलाच. तो पचवलाही आहे. त्यातला काही भाग चीनलाही देऊन टाकला. त्यानंतरही चीनने मोठा भूभाग बळकावला आहे. भारत-चीन सीमेदरम्यान सिंधू नदीपर्यंतचा भूभाग बळकावण्याचा कट चीनने आखला आहे, अशी गंभीर नोंद जम्मू-काश्‍मीर सरकारच्या एका अहवालात करण्यात आली आहे. त्याच हेतूने लेहच्या ईशान्येकडे असणाऱ्या डोकबुग परिसराला चीनने लक्ष्य केल्याची नोंदही या अहवालात आहे. पाकिस्तान, चीनपासून देशाला मोठा धोका केव्हाही होऊ शकतो. 

बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळसारख्या अनेक देशांना चीनने आपल्या कच्छपी लावले आहे. ही सगळी मंडळी भारताला वाकुल्या दाखवत चीन-पाकिस्तान गटात केव्हाही सामील होऊ शकतात. नेपाळमध्ये चीन पुरस्कृत माओवाद फोफावला असून तिथे चीनने पद्दतशीर पाय रोवले आहेत. चीनशी समझौता करण्यासाठी बैठका, चर्चेचे गुर्‍हाळ सुरू आहे. पण त्यातून काहीही निष्पन्न होताना दिसत नाही. चीनकडून आगळीकी सुरूच आहेत. तिकडे पाकिस्तानही कुरापती काढण्याची एकही संधी सोडत नाही.

या सगळ्या संदर्भात निषेधाशिवाय आणि राजनैतिक दबावाशिवाय आपण काहीच करू शकलो नाही. म्हणूनच १९६२,१९६५, १९७१ अशी तीन युद्धे लढूनही आणि त्यातील दोन युद्धात पाकिस्तानला अस्मान दाखवूनही आपण 'विजयी' ठरलो नाही. पाकिस्तान पुरस्कृत कारवाया चालूच आहेत. त्यातच आता दहशतवाद्यांना पद्धतशीरपणे प्रशिक्षित करून भारतात हिंसाचार माजविण्याचा 'कसाब फॉर्म्युला'ही यशस्वी ठरला आहे. हे सगळे पहाता, या पुढचे प्रजासत्ताक दिन आपण किती सुरक्षित असू?

भारत आणि दहशतवाद
१. भारतात 1970 पासून 2004 दरम्यान अतिरेक्यांनी 4,100 वेळा हल्ला केला आहे.
२ या हल्ल्यात सुमारे बारा हजार जणांचे बळी गेल्याची नोंद.
३. भारतात सीमीसह अतिरेक्यांचे 56 गट. ४. उपरोक्त काळात देशात दरवर्षी सरासरी 360 लोक प्राणघातक हल्ल्यात बळी पडले.
५. अतिरेक्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याचे प्रमाण 38.7 टक्के, तर 29.7 टक्के बॉम्बहल्ला आणि 25.5 टक्के वेळा भ्याड हल्ला करण्यात आला.
- सुश्रुत जळूकर
(संदर्भः ग्लोबल टेररिझम डेटाबेस आणि स्टडी ऑफ टेररिझम अँड रिस्पॉन्सेस(स्टार्ट)