गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. मागोवा-२००७
Written By वार्ता|

अतिरेकी कारवाया मागील पानावरून पुढे

दिल्ली अटारी समझोता एक्सप्रेसमध्ये झालेला स्फोट, हैदराबादमध्ये ऐतिहासिक मक्का मशिदीतील स्फोट व उत्तर प्रदेशात वाराणसी, फैजाबाद व लखनौतील न्यायालयांना साखळी बॉम्बस्फोटांनी केलेले लक्ष्य....अशा दहशतवादी घटनांनी या वर्षाला एक काळा चेहरा दिला. पण या घटना घडूनही सर्वसामान्य लोकांचे मनोधैर्य मात्र खचले नाही.

देशभरात डिसेंबरच्या मध्यापर्यंत दहशतवादी घटनांमध्ये २४६५ जणांचा मृत्यू झाला. त्यात ११२५ अतिरेकी, ९५७ नागरीक व ३३३ सुरक्षा कर्मचारी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतावादी कारवायांमध्ये घट झाल्याचे जाणवले. या राज्यात दहशतवादी घटनांत ७६८ जणांना प्राण गमवावे लागले. १९९० नंतरचा हे सर्वांत कमी प्रमाण आहे. १९९० मध्ये १७७ जणांचा मृत्यू झाला होता. २००१ मध्ये हे प्रमाण ४५०७ होते.

या वर्षातील प्रमुख दहशतवादी घटनांत समझोता एक्सप्रेसमधील स्फोटाचा उल्लेख करावा लागेल. दहशतवाद्यांनी भारत व पाकदरम्यान चाललेली शांतता प्रक्रिया रोखण्याच्या हेतूने या गाडीत स्फोट घडवून आणला. त्यात ६८ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढच्याच महिन्यात १५ मार्चला माओवाद्यांनी रानी बोदलीमध्ये पोलिसांवर हल्ला चढवून ५५ पोलिसांची हत्या केली.

दहशतवाद्यांना धर्म नसतो, हे हैदराबादेतील मक्का मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटाने सिद्ध झाले. हैदराबाद या वर्षी दोनवेळा अतिरेक्यांचे लक्ष्य झाले. पहिल्यांदा सोळा मेस व दुसऱ्यांदा २५ ऑगस्टला. पहिल्या घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या स्फोटांत ४४ जणांना प्राण गमवावे लागले. यात महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांचा समावेश होता. संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी तेथे गेले होते. लुंबिनी पार्क येथे झालेल्या स्फोटात त्यांचा मृत्यू झाला.

याशिवाय २३ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशातील लखनौ, वाराणसी व फैजाबाद येथील न्यायालयांना दहशतवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोट घडवून लक्ष्य केले. त्यात अनेकांचे जीव गेले.

या घटना वगळल्या तर त्या तुलनेत देशांत फार मोठ्या अशा दहशतवादी घटना घडल्या नाही. ईशान्य भारतातील दहशतवाद मात्र या वर्षात वाढला.

माओवाद्यांच्या कारवायात या वर्षी काहीशी घट झाली. गेल्या वर्षी त्यांच्या कारवायांत ७४२ जणांना प्राण गमवावे लागले. यावर्षी ही संख्या ६१३ पर्यंत खाली आली.

या वर्षाचे वैशिष्ट्य म्हणजे अतिरेक्यांनी घातपाती कारवायांचे तंत्र काहीसे बदलले. स्लीपींग सेलचा वापर करून बरेच स्फोट घडविण्यात आले. गेल्य काही महिन्यात झालेल्या अतिरेकी घटनांची जबाबदारी हरकत उल जिहादी इस्लामिया उर्फ हुजी या अतिरेकी संघटनेने घेतली आहे. या संघटनेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम पैसा पुरवतो असे स्पष्ट झाले आहे.