शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By भाषा|

क्रिकेटसाठी मुलांवर दबाव नाही

'आपली कारकीर्द घडविण्याचा निर्णय मी मुलांवर सोडला आहे. त्यांनी क्रिकेट खेळावे यासाठी कोणताही दबाव मी टाकत नाही. त्यांचा निर्णय हा त्यांचाच राहणार असून मी फक्त मार्गदर्शकाच भूमिका पार पाडणार आहे,' असे भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सांगितले.

सचिन 16 वर्षांचा असताना 1989 साली पाकविरुद्ध सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर आज तो क्रिकेटची यशोगाथा झाला आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीस 20 वर्षे होणार असल्याबद्दल सचिनने एका ‍वृत्तवाहिनीस मुलाखत दिली. त्यात त्याने एक वडीलांच्या नात्यातील भूमिका विषद केली. तो म्हणाला,' अर्जुन (सचिनचा मुलगा) हा सतराव्या वर्षी टीम इंडियात असावे हे माझे स्वप्न नाही. त्याला काय खेळायचे आहे, हा त्याचा निर्णय असेल. मी लहानपणी क्रिकेट खेळत होतो, परंतु अर्जुन टेनिस खेळत आहे. त्याने क्रिकेट खेळावे, यासाठी मी कोणताही दबाव आणत नाही. मी फक्त त्याला मार्गदर्शन करण्याची भूमिका पार पाडतो.'

मुलांना आपण क्रिकेटमधील 'बादशाहा'ची मुले असल्याचे वाटते का? या प्रश्नावर सचिन म्हणाला,' मी माझ्या मुलांसाठी फक्त त्यांचा वडील आहे. कुटुंबात असताना मी कोणताही खेळाडू राहत नाही.' मुलासाठी पहिली पाच सहा वर्ष मला कठीण गेली. मी घराबाहेर (क्रिकेट दौर्‍यानिमित्त) सतत जाणे त्यांना आवडत नव्हते. तो माझ्याशी फोनवरही बोलत नव्हता. वडील म्हणून माझ्यासाठी तो कठीण काळ होता. परंतु हळूहळू त्यांना समजायला लागले आणि आता सर्वकाही सुरळीत आहे, असे मास्टर ब्लास्टरने सांगितले.