गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी साहित्य संमेलन २०१०
Written By वेबदुनिया|

मराठीच्‍या श्‍वासाची लय संत वाङमयाने घडविलीः दभि

संत वाङमय घडविण्‍यात ग्रामीण जीवनाच्‍या कष्‍टाचा गंध अधिक महत्‍वाचा ठरला असून मराठी समाजाच्‍या श्‍वासाची लयच या संत वाङमयाने घडवल्‍याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष द.भि. कुलकर्णी यांनी व्‍यक्त केले.

पुणे येथे सुरू असलेल्‍या 83 व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या उदघाटन प्रसंगी अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. द.भि. म्‍हणाले, की मराठीला समृध्‍द करण्‍यात संत वाङमयांची मोठी परंपरा असली तरीही या संत वाङमयाला ग्रामीण बोली भाषेने समृद्धता दिली आहे. मला ज्ञानेश्‍वरांच्‍या ओवीतील साडेतीन चरणांची लय ग्रामीण पुणेरी भाषेत आढळून आली आहेत. किंबहुना ग्रामीण जीवनाच्‍या कष्‍टाचा गंधच ग्रामीण बोलीला आला आणि या बोलीनेच संत साहित्याला आणि मराठीला पूर्णत्व मिळवून दिले असावे. त्‍यामुळे या विषयावर अधिक संशोधन करण्‍याची गरज आहे.

ज्‍या प्रमाणे एका भृंग्याचा आवाज कर्णककर्श वाटतो मात्र जेव्‍हा अनेक भृंगे एकत्र येऊन कुंजरवर करतात तेव्‍हा तो ध्‍वनी आल्‍हाददायक वाटत असतो साहि‍त्य संमेलन हे असाचा समुहाचा शांत आवाज असल्‍याचे आणि त्यातून साहित्य कणांची देवाण घेवाण होत असल्‍याचे दभि म्हणाले.

तत्पूर्वी, साहित्‍य संमेलनास महाराष्ट्र गीताने सुरूवात झाली. संमेलनाचे अध्यक्ष द. भि. कुलकर्णी यांचे स्वागत करून त्यांच्‍याकडे संमेलनाची सूत्रे देण्यात आल्‍याची घोषणा महाराष्‍ट्र साहित्य महामंडळाचे अध्‍यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली.

यावेळी संमेलनाचे उद्‌घाटक कवी ना. धो. महानोर यांच्यासह महाबळेश्‍वर येथे झालेल्‍या 82 व्‍या संमेलनाचे अध्यक्ष आनंद यादव यांचाही सत्कार करण्यात आला.

पुण्‍याच्‍या बाजीराव रस्‍त्‍यावर गेल्‍या 42 वर्षांपासून पुस्‍तक विक्री करणा-याच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करून संमेलनाचे उदघाटन करण्‍यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष डॉ. सतीश देसाई, महामंडळाचे मावळते अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्‍यासह पुण्‍याचे महापौर मोहनसिंग राजपाल, पालकमंत्री अजित पवार, खासदार सुरेश कलमाडी, उल्हास पवार आदींनीही दीपप्रज्वलन केले. संमेलनाच्‍या उदघाटन समारंभास अनेक दिग्गजांसह ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागूही उपस्थित होते.

स्वागताध्यक्ष डॉ. सतीश देसाई, कौतिकराव ठाले-पाटील यांनीही यावेळी मनोगत व्‍यक्त केले.