मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शिवजयंती
Written By वेबदुनिया|

शिवरायांचे कुलदैवत तुळजाभवानी

- महेश जोशी, औरंगाबाद

‘महिषासूरमर्दिनी' तुळज
महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन पीठे असून उस्मानाबाद जिल्हातील श्रीक्षेत्र तुळजापूर हे पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातची कुलस्वामिनी आणि हजारो घराण्यांचे कुलदैवत असणार्‍या देवीचे हे स्थान जागृत असून नवसाला पावणारे आहे. संकटाला धावून येणार्‍या तुळजाभवानीचे इतिहासातही दाखले सापडतात. हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजा तुळजाभावनीचे निस्सीम उपासक होते. युद्धाला जाण्यापूर्वी महाराज दरवेळी देवीचे दर्शन घेत असत. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात आईने महाराजांना तुळजाभवानी तलवार प्रदान केल्याचे सांगितले जाते.

श्रीक्षेत्र तुळजापूर हे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात डोंगर पठारावर वसलेले गाव आहे. समुद्रसपाटीपासून २७० फुट उंचावर असलेले हे तालुक्याचे ठिकाण उस्मानाबादपासून १८ किलोमीटर तर सोलापूरपासून ४४ किलोमीटरवर आहे. पूर्वी हा भाग डोंगराळ पण घनदाट अरण्याने व्यापलेला होता. या भागात चिंचेची खूप झाडे असल्याने त्यास चिंचपूर असेही म्हटले जायचे. 
तुळजा भवानी मंदिर 
श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसर्‍या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायर्‍या आहेत. पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर डाव्या बाजूस पोस्ट ऑफिस आणि उजव्या बाजूला श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यालय आहे. या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर धार्मिक ग्रंथालय व श्री संत तुकाराम धार्मिक ग्रंथालय असून, तिसरा कक्ष समर्थ विशेष अतिथी कक्ष आहे. पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सागितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धीविनायक आहे. येथेच आदीशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही लक्षवेधून घेतात.  
तुळजा भवानीची मूर्ती 
सरदार निंबाळकर या प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या मुख्य गाभार्‍याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. तीन फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आईच्या आठ हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सुर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे. देवीच्या उजव्या बाजूला मार्केंडेय ऋषी व सिंह आहे. तर डाव्या बाजूस कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती दिसून येते.

श्री तुळजाभवानी देवीची मुर्ती चल मुर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवून गाभार्‍याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते. प्राचीन काळात आद्य शंकराचार्यांनी श्रीयंत्रावर देवीच्या मूर्तीची स्थापना केल्याचे सांगितले जाते. तुळजाभवानीचे मंदिर हेमाडपंती असून त्यात कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिराच्या गाभार्‍यातच एका खांबावर चांदीचा कडा आहे. सात दिवस त्यास स्पर्श केल्याने जुनाट आजार बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
तुळजा भवानीचे पुराणातील उल्लेख