Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

शिवरायांचे आठवावे रूप

shivaji
वेबदुनिया|
कपाळावर 'शिवगंध', शिवाजी महाराजांसारखीच भरघोस काळीभोर दाढी. भेदक डोळे. महेश उपाख्य आप्पासाहेब उपासनींना भेटल्यावर अगदी 'शिवरायांचे आठवावे रूप' हा भास झाल्याशिवाय रहात नाही. पण महाराजांसारखे दिसण्याव्यतिरिक्तही त्यांच्यात आणि महाराजांमध्ये बरेच साम्य आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतर हा माणूस शिवकालातच जगतो याचीही खात्री पटते.
नाशिकच्या पवननगरमध्ये रहाणारे आणि अंबडमधल्या दिपारेना इलेक्ट्रिक कंपनीत कार्यरत असणारे उपासनी परिसरात 'महाराज' म्हणून 'फेमस' आहेत. अनेक कार्यक्रमात ते शिवाजी महाराजांच्या पेहरावात असतात. उपासनी महाराजांसारखे दिसतात, याहीपेक्षा ते त्यांच्यासारखे जगण्याचा प्रयत्न करतात याचा जास्त अचंबा वाटतो. केवळ उपासनीच नव्हे तर त्यांचे आख्खे कुटुंबच आजच्या काळातही 'शिवकालात' जगते आणि भेटणार्‍या प्रत्येकाच्या मनात हा काळ जागा करते.

अभिनेत्यांच्या बाबतीत भूमिका जगणे असा उल्लेख नेहमी केला जातो. उपासनी हे काही सरावलेले अभिनेते नाहीत. पण भूमिका जगण्याशी मात्र त्यांचा थेट संबंध आहे. कारण ते फक्त मिरवणुकांपुरते शिवाजी नसतात. शिवरायांचे अनुकरण त्यांनी आपल्या वास्तव जीवनातही तितक्याच कठोरपणे केले आहे. आणि या वेडाने त्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबालाही तितक्याच तीव्रतेने झपाटल्याची खात्रीही त्यांना भेटल्यानंतर कळते.

पण शिवरायांचे हे वेड उपासनींच्या मनात घुसले कसे? त्याची मोठी कथाच आहे. उपासनींची 'पर्सनॅलिटी' तशी भारदस्त. प्रभाव टाकणारी. एकदा ते बाबासाहेब पुरंदरेंना भेटले आणि या शिवशाहिराने शिवप्रेमाचे बीज त्यांच्या मनात पेरले. बाबासाहेंबांच्या त्या भेटीचा परिणाम एवढा झाला की आजच्या काळात रहाणारे उपासनी थेट साडेतीनशे वर्ष मागे गेले. आणि मग शिवरायांसारखे जगणे सुरू झाले. 'की घेतले न हे व्रत आम्ही अंधतेने' या भावनेतून उपासनींनी शिवरायांना समजून उमजून घेऊन त्याचा अंगीकार केला. त्यांच्याविषयीची अनेक पुस्तके वाचली. शिवरायांच्या ते प्रेमातच पडले.

बरं हे शिवप्रेम तरी किती असावे? उपासनींच्या घराला एखाद्या गड-किल्ल्याचे स्वरूप नाही एवढाच फरक. बाकी ते शिवकालातच जगतात. त्यांच्या घरात शिवरायांची मूर्ती आहे. तिच्यासमोर रोज रांगोळी काढली जाते. तिची दैनंदिन पूजा केली जाते. आरती केली जाते. शिवरायांच्या जयंती, शिवराज्यभिषेकदिनी उपासनींच्या घरी उत्सवी वातावरण असते. शिवपुतळ्यासमोर गोडधोडाचा नैवैद्य ठेवला जातो. त्यादिवशी उपासनी कुटुंब पूर्णपणे 'साडेतीनशे वर्ष' मागे गेलेले असते. इतकेच नव्हे तर शिवरायांविषयीची पुस्तकेही पारायणासारखी वाचली जातात. त्यावेळी संपूर्ण उपासनी कुटुंब भक्तीभावाने एकत्र बसून शिवपराक्रम ऐकत असतात. कुणाच्या लग्नात गेले तरी हे कुटुंब शिवरायांच्या संदर्भातील वस्तू वा पुस्तकच भेट म्हणून देते. किंवा घरात काही कार्यक्रम असल्यासही त्याची प्रेरणा शिवरायच असतात. घरात शिवरायांवर आधारीत ऐतिहासिक चित्रपटच प्रामुख्याने पाहिले जातात.

उपासनींची पत्नी उमा आणि मुले कुमार व कल्याणी हेही शिवप्रेमाने झपाटलेले आहेत. त्यांच्या शाळकरी मुलाला -कुमारला- शिवरायांची गोष्ट ऐकल्याशिवाय झोप येत नाही. कल्याणीचीही तीच अवस्था आहे. शिवरायांसारखीच (पण खोटी!) ढाल-तलवार घेऊन कुमार खेळत असतो. तो काही चुकीचे वागल्यास महाराजांच्या लहानपणीचा दाखला देऊन त्याच्यावर 'संस्कार' केले जातात. मुलाला आता शिवरायांसारखे सिंहासन हवे आहे. हा त्याचा ताजा हट्ट पुरविण्याच्या प्रयत्नात उपासनी आहेत.

आपण शिवाजी महाराजांसारखे दिसतो ही बाब उपासनींच्या दृष्टिने अभिमानाची असली तरी त्यांच्या मते ही मोठी जबाबदारी आहे. एवढ्या मोठ्या माणसारखे रहाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे, असे ते सांगतात. शिवरायांसारखे जगण्यामुळे त्यांनी स्वतःत अनेक बदल घडवून घेतले आहेत. अनेक दुर्गुणांना तिलांजली दिली आहे. शिवरायांच्या व्यक्तित्वाला जे शोभा देत नाही ते न करण्याकडेच त्यांचा कल असतो. एकदा कंपनीतल्या एकाने त्यांना गुटखा आणायला सांगितला. ते आणायला गेले आणि तिथे एकाने शिवाजी महाराजांनी गुटखा घेणे शोभत नाही, असे सांगितल्यावर त्यांनी हे काम यापुढे कधीही न करण्याचे त्यांनी ठरविले.

प्रती शिवाजी दिसण्यासंदर्भात अनेकांच्या 'कॉम्प्लिमेंट्स' त्यांना मिळाल्या. पण यामुळे आपल्यावरची जबाबदारी वाढते, असे ते सांगतात. कुठेही फिरताना त्यांच्याकडे लोक शिवाजी म्हणूनच बघतात. एका मिरवणुकीत एका आजीबाईंनी खास त्यांची भेट घेऊन तुमच्याकडे बघितलं की 'शिवाजी महाराजांचा भास होतो' असं सांगितलं. उपासनींना आपल्या भूमिकेचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. शिवाजी महाराजांची भूमिका कायमस्वरूपी जगण्यामागेही उपासनींची सुस्पष्ट अशी भूमिका आहे. त्यांच्या मते माझ्यामुळे लोकांना शिवाजी महाराजांची आठवण होते ही बाब महत्त्वाची आहे. आजच्या काळात शिवरायांचे विचार अत्यंत गरजेचे आहेत. शिवरायांनी जात, पात, धर्म यांचा विचार कधीही केला नाही. खर्‍या अर्थाने ते धर्मनिरपेक्ष राज्यकर्ते होते. ही बाब आजही अंगीकारण्याची गरज आहे. शिवाय त्यांचा पराक्रम, दूरदृष्टी या अशा अनेक बाबी अनुकरणीय आहेत.

उपासनींच्या या 'वेडामागची' प्रेरणा 'शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी' एवढीच आहे. शिवरायांसारखे जगण्यातून आमदनीची त्यांची अजिबात अपेक्षा नाही. उलट असे जगण्यात त्यांना स्वतःलाच तोशीस द्यावी लागते. प्रसंगी आपल्या रजा, सुट्यांवर पाणी सोडावे लागते. पण केवळ शिवप्रेमापोटी हा त्याग ते करतात. या सगळ्यांत त्यांची पत्नी उमा यांचीही मोठी भूमिका आहे. शिवाजी महाराज म्हणून कुठल्या मिरवणुकीत जायचे असल्यास उमावहिनी त्यांचा सगळा मेकअप करून देतात. त्याही पतीइतक्याच शिवप्रेमाने झपाटलेल्या आहेत.

उपासनी शिवाजी महाराजांचा पेहराव करून अनेक कार्यक्रमात सहभागी होत असले तरी आता त्यांना ठोस काही करायचे आहे. शिवाजी महाराजांवर आधारीत एकपात्री प्रयोग करण्याचा त्यांचा मानस आहे. यातून शिवाजी महाराज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यासंदर्भातच ते सध्या काम करत आहेत. त्यासाठी भरपूर वाचन, चिंतन सुरू आहे. उपासनी यांची मनोकामना लवकरच पूर्ण होवो याच त्यांना शुभेच्छा.

चौकट
'बहुरूपी' उपासनी
उपासनींच्या व्यक्तित्वाला शिवरायांचे कोंदण असले तरी अनेक व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या आहेत. नाशिकमध्ये झालेल्या अश्वमेध क्रीडा स्पर्धेत ते 'मंगल पांडे' बनले होते. परशुराम जयंतीदिनी ब्राह्मण समाजातर्फे काढलेल्या मिरवणुकीत 'शीघ्रकोपी' परशुराम त्यांच्यातूनच प्रकटला होता. आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडकेंचा पराक्रमही उपासनींच्याच व्यक्तित्वातून प्रकट झाला होता. एवढंच कशाला काही दिवसांपूर्वी झालेल्या जाणता राजा या महानाट्यात समर्थ रामदासांची भूमिकाही उपासनींनीच केली होती. आणि शिवाजी महाराज हे तर खुद्द उपासनींचे दैवतच. त्यामुळे अनेक शिवजयंती वा इतर मिरवणुकांत शिवाजी महाराजांची भूमिका असली की त्यासाठीचा शोध उपासनींपर्यंत संपत असतो.


यावर अधिक वाचा :