गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. श्रावण
Written By वेबदुनिया|

बारा ज्योर्तिलिंग

WD

1. सौराष्ट्रातील सोमनाथ - गुजरातमध्ये सौराष्ट्रात वसलेले सोरटी सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. देशातील प्राचीन तीर्थस्थळांत सोमनाथ मंदिराचा समावेश होतो. त्याचा उल्लेख स्कंदपुराण, श्रीमदभागवत गीता, शिव पुराणात आढळतो. वेद, ऋग्वेदातही सोमेश्वर महादेवाचा महिमा वर्णिला आहे.

पुराणात या मंदिराच्या अनुषंगाने एक कथा आहे. चंद्राचे सोम असे नाव होते. तो दक्षाचा जावई होता. एकदा त्यांनी दक्षाची अवहेलना केली. त्यामुळे राग येऊन दक्षाने त्यांचा प्रकाश दिवसादिवसाने कमी होत जाईल असा शाप दिला. अन्य देवतांनी दक्षाला उःशाप देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते, तेथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम रहाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सोमाने सौराष्ट्रातील या ठिकाणी येऊन येथे स्नान केले आणि भगवान शिवाची आराधना केली. शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी त्याचा उद्धार केला. त्यामुळे हे स्थान सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.

2. श्री शैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुन - गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याक‍िरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.

3. उज्जैन येथील महाकालेश्वर : उज्जैनचे महाकाल मंदिर हे शंकराच्या बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी एक आहे. हे एकमेव दक्षिणमु्‍खी शिवलिंग आहे. तांत्रिक-मांत्रिकांसाठीही हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले जाते. श्री महाकाल मंदिराची प्रशंसा महाभारतकालीन वेद व्यासांपासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केली आहे.

येथील मंदिराची निर्मिती अकराव्या शतकात झाली. त्यानंतर जवळपास 140 वर्षानंतर दिल्लीचा सुलतान इल्तुतमिशाने उज्जैनवर आक्रमण करून हे मंदिर उध्वस्त केले. सध्याचे मंदिर मराठाकालीन आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अडीचशे वर्षांपूर्वी शिंदे घराण्याचे दिवाण बाबा रामचंद्र शेणवी यांनी केला होता.

4. नर्मदेच्या डोंगरावरील अमलेश्वर - ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकारअमलेश्वर असें म्हणतात.
ओंकारेश्वराची शाही स्वारी

5. संथाल परागण्यातील वैजनाथ - शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.

6. जुन्नर-खेडचे भीमाशंकर - शंकराच्या बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी भीमाशंकर आहे. पुण्यापासून 110 किलोमीटरवर असलेले हे तीर्थस्थान पश्चिम घाटात वसले आहे. भीमा नदीही याच परिसरात उगम पावते. शंकराने या ठिकाणी त्रिपुरासुराचा वध केला.

त्यानंतर आलेल्या घामातून भीमा नदीचा उगम झाल्याची पौराणिक कथा आहे. हे देऊळ तुलनेने अलीकडच्या काळात बांधले आहे. याचा कळस नाना फडणवीस यांनी अठराव्या शतकाच्या सुमारास बांधला.

7. दक्षिण भारतातील रामेश्वर - दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें.

8. तीन लिंगाचा समावेश असलेले नागेश - श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्‍याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्‍या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.

9. वाराणशी येथील काशीविश्वेश्वर - वाराणशीस (काशीस) प्रसिद्धच आहे. जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो. गंगा नदीच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. ही नगरी भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही विख्यात आहे. याच नगरीत काशी विश्वनाथाचे वास्तव्य आहे. हे मंदिर शंकराच्या प्रमुख ज्योतिर्लिंगामधील एक मानले जाते. लोक येथे केवळ दर्शनासाठीच येतात, असे नाही तर आयुष्यात मोक्ष प्राप्ती व्हावी ती इथेच असे त्यांना वाटते. परदेशातूनही लोक येथे येतात आणि गंगेच्या घाटाच्या सानिध्यात वसलेल्या मठ-मंदिरात जाऊन मनाला शांती देऊ शकणार्‍या साधूंच्या चरणी नतमस्तक होतात.

10. नाशिकचे त्र्यंबकेश्वर - शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये त्र्यंबकेश्वरचा समावेश होतो. दक्षिणेची काशी मानले जाणार्‍या नाशिकपासून हे ज्योतिर्लिंग 35 किलोमीटरवर आहे. ज्योतिर्लिंग स्तोत्रातही त्र्यंबकम गौतमी तटे असे म्हणून त्र्यंबकेश्वराचा उल्लेख केला आहे.त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. याच पर्वतावर पवित्र गोदावरी नदी उगम पावते.

11. हिमालयातील केदारेश्वर - हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.

12. दौलताबादमधील घृष्णेश्वर - (घृश्मेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर (घृश्मेश्वर) म्हणतात.