Widgets Magazine

श्रावणरंग

shrawan
वेबदुनिया|
श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येते सर सर शिरवे
क्षणात फिरूनी ऊन पडे
हळदीच्या उन्हाचा प्रत्यय अन् मधूनच सरींचा शिडकावा घेऊन श्रावणरंग सुरू झाले की जणू अवघे चराचर हर्षोल्हासाने मोहरून निघते. श्रावण आणि जानपद गीतांचे एक अतूट नाते लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱया लोकसाहित्यात ठाई-ठाई पहायला मिळते. श्रावणसरी एखाद्या माहेरवाशिणीसारख्या आपल्या दारी आल्या की बालकवी, कृ. ब. निकुंब यांच्या कविता आठवतात. या कवितांमधूनही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मराठी लोकसंस्कृतीचे दर्शन घडते.

shrawan fugdi

घाल घाल पिंगा वाऱया माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसा

कृ. ब. निकुंब यांची ही कविता नजरेखालून घातली की जानपद गीतांची फार मोठी परंपरा दृग्गोचर होते. श्रावण महिन्यात जानपद गीतांचे लोकरंग आणि कीर्तन सप्ताहाच्या रूपाने व पोथ्यांच्या रूपाने भक्तीरंग असा कृष्णा -कोयना संगम सुरू होतो. भक्तीरंग आणि लोकरंगात न्हालेला श्रावण म्हणजे श्रवणभक्तीची आनंद पर्वणी!

नागपंचमीच्या सणाला आलेल्या माहेरवाशिणी घराच्या अंगणात अथवा गावाच्या एखाद्या प्रांगणात फेर घरून नाचू लागतात. पिंगा, फुगडी, 'इस बाई इस दोडका किस` या व अशा अनेक खेळगीतांतून रामायण, महाभारत, पुराणे यांच्या मौखिक स्वरूपातील कथा रंगू लागतात.

'धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवाा`

हे फेराचे कथागीत यातून मौखिक परंपेतले लोकरामायण रंगत जाते. स्त्रिया नागपंचमीच्या सणाच्या आधीच खेळगीतात, खेळनृत्यात रंगून जातात. फुगडी, झिम्मा, कोबंडा व या खेळनृत्याच्या वेगळया वेगळया परी नागपंचमीच्या निमित्ताने उलगडत जातात. फुगडयांमध्ये बस फुगडी, उभी फुगडी, खराटा किंवा झाडू फुगडी, दोघींची फुगडी, चौघींची फुगडी, दोघी किंवा चौघींच्या फुगडीत त्यांच्या हातावर उभी राहिलेली आणखी एखादी म्हणजे जणू फुगडीचा मानवी मनोरा.

आपण दोघी मैत्रीणी जोडीच्या जोडीच्या ।
हातात पाटल्या तोडीच्या तोडीच्या ।।
हातात पाटल्या सोन्याच्या सोन्याच्या ।
आम्ही दोघी मैत्रीणी वाण्याच्या वाण्याच्या ।।

या व अशा अनेक फुगडीच्या गाण्यांमधून लोकसंस्कृतीचे दर्शन घडते.

काळा कासोटा भुई लोळता, भुई लोळतो ।
जेजुरीचा खंडोबा फुगडी खेळतो ।।

फुगडीच्या गीतांमध्ये विठ्ठल-रूक्मिणी, खंडोबा-बाणाई-म्हाळसा, शंकर-पार्वती-गंगा यांचे हमखास उल्लेख आढळतात. ही गीते हमखास झिम्मा खेळताना सादर होतात.

shrawan
श्रावण अंगणी आणि प्रांगणी अशी कथा-गीते, खेळनृत्ये रंगत असतात तसेच मंदिरात कीर्तन व पोथी सुरू असते. पांडव प्रताप, हरिविजय, काशीखंड, नवनाथ आदी ग्रंथांची पारायणे महिनाभर सुरू असतात. श्रीधरपंत नाझरेकरांच्या पोथ्यांचे वाचन करताना कथेकरीबुवा त्या ओव्यांचा अर्थ रसाळ वाणीत सांगत असतो. श्रावणात कीर्तन सप्ताह रंगतात. मुंबईला माधवबागेत कीर्तन सप्ताह महिनाभर सुरू असतो. या कीर्तन सप्ताहात एकेकाळी ह. भ. प. विष्णुबुवा जोग, बंकट स्वामी, मामासाहेब दांडेकर, धुंडामहाराज देगलुरकर आदी मान्यवर कीर्तनकारांची कीर्तने होत. गो.नी. दांडेकर यांच्या 'माची वरला बुधा` या कादंबरीत माधव बागेतील या कीर्तन सप्ताहाचा उल्लेख आहे. श्रावण महिना म्हणजे भक्तीरंग आणि लोकरंग यांचा अनोखा संगम !


यावर अधिक वाचा :