गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By Kiran Joshi|

हरीपुरची श्रावणी यात्रा

श्रीरामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या कृष्णा-वारणेच्या संगमातीरी श्रीक्षेत्र हरीपूर येथे भरणा-या श्रावणी यात्रेला मोठी परंपरा आहे. हरीपूर हे निसर्ग सौंदर्याने नटलेले सांगली नजीकचे टुमदार गाव. संथ वाहणा-या कृष्णेच्या प्रवाहास वेडीवाकडी वळणे घेत आलेली वारणा नदी याच ठिकाणी मिळते. याच नद्यांमुळे हा भाग समृध्द बनला आहे. 

 सांगली बसस्थानकावरून बाहेर येताच बाजूच्याच चौकात टांगे (घोडागाड्या) नजरेस पडतील. या टाग्यांतून केवळ पाच रूपयांत हरीपूरात जाता येते. तशा, बस आणि रिक्षाही मिळतात पण, टांग्यातून जाण्याची या जत्रेची खासीयत आहे. (या जत्रेमुळेच टांग्यांचे अस्तित्व येथे टिकून आहे) चिंचेच्या दाट बनातून टा‍ग्यांची टपटप सुरू होताच कृष्णाकाठची समृध्दी पुढे येऊ लागते.

श्रावणी सोमवारी हा रस्ता ‍गर्दीने फुलून जातो. सकाळी याच मार्गावरून हर हर महादेव... चा गजर करीत संगमेश्वराच्या भेटीसाठी पालखी हरीपूरात जाते. एक किलोमीटरच्या अंतरावर बागेतला गणपतीचे छोटे पण, सुंदर मंदिर आहे. नदीपात्रालगतच असलेल्या या मंदिरातील गणपतीची मुर्ती सुप्रसिध्द आहे. निसर्गरम्य आणि कमालीची शांतता असल्याने मनशांतीसाठीही या ठिकाणी भक्तांची गर्दी असते.

  PR
येथून थोडे पुढे गेल्यावर आपण श्री क्षेत्र हरीपुरात प्रवेश करतो. मोठ्या स्वागत कमानीतून आत प्रवेश करताच पाराचा कट्टा लागतो. याच पारावर अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. नजीकच सं‍गमेश्वर मंदिराचे प्रवेशव्दार आहे. पाय-यांवरून खाली उतरल्यावर मंदिराचा सभामंडप येतो. यात्रेदिवशी या मंडपात भगवान शंकराच्या विविध अवताराची पुजा बांधली जाते. आत सं‍गमेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. भुयारी मार्गातून आत जाताना खांबांवर नक्षीकामाचा सुंदर नमुना दिसून येतो. गाभा-यातील महादेवाची पिंड अर्थात सं‍गमेश्वर...

या पिंडीची काही वैशिष्ट्ये व आख्यायिका आहेत. श्रीराम याठिकाणी आले असताना त्यांनी या पिंडीची स्थापना केलीँ अशी अ‍ख्यायिका आहे. गाभा-यात श्रीरामाच्या पावलांच्या खुणा आहेत असे सांगितले जाते. ही पिंड अती खोल आहे व तळघरात आणखी काही पिंडी आहेत, असे सांगितले जाते. नजीकच्या नद्या कोरड्या असल्या तरी मंदीरातील मुख्य पिंडीच्या तळाशी कायम पाणी असते, हे आणखी एक वैशिष्ट्य. शिवलिंगाच्या ‍गाभा-यात सोवळ्याने प्रवेश दिला जातो. श्रावण सोमवारी नदीच्या पलीकडच्या काठावर असणा-या कोथळी गावातील तरूण पोहत याठिकाणी येतात व सोवळ्यानेच शिवलिंगाला अभिषेक घालतात. 'शिवशंभो...' असा जयघोष करीत कळशांतून शिवलिंगावर होणारा पाण्याचा अभिषेक पहाण्यासारखा असतो. दिवसभर पुजा-अभिषेक सुरू असतात. काही सार्वजनीक मंडळांकडून प्रसाद वाटपही केला जातो.

  PR
श्रावणातील चारही सोमवारी भरणा-या संगमेश्वराच्या यात्रेसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर परीसरातून भक्त येतात. या यात्रेला जशी अध्यात्मिक महत्व आहे तशी ही यात्रा तरूणवर्गाचे खास आकर्षण असते. सोमवारी शाळा- महाविद्यांलयांना सुटटी दिली जाते त्यामुळे यात्रेत एकच गर्दी उसळते. पिपाण्यांचा कर्कश आवाज, टांग्यांची टपटप आणि हर हर महादेव... च्या गजराने वातावरणात वेगळाच उत्साह भरलेला असतो. मं‍दिरानजीकच संगमाच्या काठावर लहानमुलांसाठी झुले इतर खेळणी असतात. संगमावर नौकाविहार हा देखील सुखद अनुभव असतो. कृष्णेतून संथ आणि वारणेच्या जोराचा प्रवाहातून पुढे जाणा-या होडीतून फुलू्न गेलेल्या जत्रेचे नयनरम्य दृश्य दिसते. साखरेची खेळणी हे जत्रेतील आकर्षण. गुढीपाडव्यातील साखरेच्या माळांप्रमाणेच प्राणी, फुले अशा विविध आकारात साखरेची खेळणी बनविण्यात आलेली असतात. भक्तगण याची जोरदार खरेदी करतात. त्याचप्रमाणे खेळणी, विविध वस्तुंची दुकाने गर्दीने फुलून गेली असतात.

  PR
जत्रेचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर परतीच्या प्रवासात आपण हरीपूरची पेवं पाहू शकतो. सांगली हळदीसाठी प्रसिध्द आहे. जमिनीखाली खोल भुयारे अर्थात पेवंमध्ये हळदीची साठवणूक केली जाते. पेवांमधील हळद वर्षानुवर्षे चांगली राहू शकते. निसर्गाचं देणं असणा-या हरीपूरला श्रावणाबरोबरच इतवेळीही पर्यटकांची ‍गर्दी असते. येथून सांगलीचे गणपती मंदिर, नरसोबावाडी, औदुंबर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील धार्मिकस्थळे काही अंतरावरच आहेत..

 - किरण जोशी