गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. श्रावण
Written By वेबदुनिया|

नागपंचमीला गालिप्रदानाची परंपरा !

WD
नागपंचमी साजरी करण्याची पद्धती सगळीकडे वेगवेगळी आहे. काही ठिकाणच्या प्रथा-परंपराही वेगळ्या आहेत. उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागात कुस्ती आणि बौद्धिक वादविवाद करण्याची या दिवशी प्रथा आहे. पण चांदोली जिल्ह्यातील विसपूर व महुआरी गावात मात्र या दिवशी संवाद होतो, पण तो शिव्यांनी. होय, तुम्ही वाचता ते योग्यच आहे. या दोन गावात या दिवशी मुक्त गालीप्रदान होते. इतकेच नव्हे, तर परस्परांवर दगडफेकही केली जाते. पण या दिवसानंतर मात्र त्यांच्यात कोणताही राग, द्वेष रहात नाही. हे सगळं फक्त एका दिवसासाठी असते.

ही विचित्र प्रथा बंद करण्याचेही एकदा ठरविण्यात आले होते. मात्र, गावावर आपत्ती कोसळल्यानंतर ही प्रथा बंद करण्याचा विचार दूर सारण्यात आला. उलट ही प्रथा अधिक जोमाने साजरी केली जाऊ लागली. त्याला उत्सवी रूप आले.

नागपंचमीच्या दिवशी दोन्ही गावातील लोक हद्दीवर येतात. परस्परांना शिव्या देतात. निंदा करतात. परस्परांवर दगडही फेकतात. दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम सुरू होतो. सुरवातीला महिला कजरी व सोहर ही इथल्या परंपरेने चालत आलेली गीते गातात. देवाला प्रसन्न करण्यासाठी असे केले जाते. त्यानंतर मग गालिप्रदान सुरू होते.

प्रामुख्याने महिला एकमेकांना शिव्या घालतात, उणीदुणी काढतात. त्यानंतर पुरूष परस्परांवर दगडफेक करतात.