शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. श्रावण
Written By वेबदुनिया|

रामायणातील घटनांचे रामलिंग जिवंत साक्षीदार

पुरातन तीर्थक्षेत्र

WD
रामायणातील पौराणिक घटनांचे जिवंत साक्षीदार असलेले आणि निसर्गाच्या कुशीत हजारो वर्षापासून वसलेले उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील रामलिंग हे तीर्थक्षेत्र श्रवण महिन्यात भाविकांच्या श्रद्धेचे मुख्य आकर्षण असते. त्यामुळेच येडशीच्या अभयारण्यातील या पुरातन तीर्थक्षेत्राला श्रवण महिन्यात यात्रेचे रूप प्राप्त होते.

उस्मानाबाद शहरापासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील रामलिंग हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या अभयारण्याच्या मधोमध्ये हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे आजही याठिकाणी एखाद्या पौराणिक स्थळावर आल्याचा प्रत्यय भाविकांना येतो. रावणाने सीतेचे हरण करून लंकेकडे जात असताना याच अभयारण्यात रावणाला रामभक्त जटायूने रोखले होते. रावणाशी दोन हात करून घायळ अवस्थेत पडलेल्या जटायूची रामभेट याच ठिकाणी झाली. याठिकाणी जटायूची समाधी असल्यामुळे या तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

मंदिराला वळसा घालून वाहणारी नदी, मंदिराच्या पाठीमागे कोसळणारा धबधबा आणि अभयारण्यातील डोंगराच्या अंगाखांद्यावर असलेल्या झाडीमध्ये इकडून तिकडे वावरणारी माकडे अशा निसर्गरम्य वातावरणामुळे श्रवण महिन्यात दूरवरून भाविक हमखास रामलिंग तीर्थक्षेत्राला भेट देण्यास येतात. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नदी वाहू लागली आहे. धबधबा कोसळू लागला आहे. त्यामुळे भाविकांबरोबरच निसर्गाचा आस्वाद घेणार्‍या र्पटनप्रेमी नागरिकांनाही रामलिंग तीर्थक्षेत्र भुरळ घातल्याशिवाय राहात नाही.