शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

सिंधूची पद्मभूषणसाठी शिफारस

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिची प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. सिंधूने काही दिवसांपूर्वीच कोरियन ओपन सुपर सीरिजचे अजिंक्यपद पटकावले आहे. या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याचा मान सिंधूने मिळवला. यंदाच्या पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली सिंधूही दुसरी खेळाडू आहे. याआधी काही दिवसांपूर्वीच क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या नावाची शिफारस पद्मभूषण पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
 
क्रीडा मंत्रालयाने केंद्र सरकारकडे पद्मभूषण पुरस्कारासाठी सिंधूची शिफार केली आहे. याबाबत क्रीडा मंत्रालयानेही दुजोरा दिला आहे. सिंधूने नुकतेच कोरिया ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद मिळविले होते. गेल्या काही स्पर्धांमध्ये सिंधूची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे.
 
सिंधूने 2016 मध्ये झालेल्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती. सिंधूला यापूर्वी भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. याआधी मार्च 2015 मध्ये सिंधूला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.