शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

पेलेटॉनचा थरार, धनराज पिल्ले उपस्थित राहतील

नाशिक सायकलीस्ट आणि जायंट स्टारकेन यांच्यातर्फे आयोजित नाशिक पेलेटॉन २०१७ या सायकल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील शनिवार सुरू झाली. पहिल्या टप्प्यात १५ किमी आणि ५० किमी अंतराच्या सर्व वयोगटातील स्पर्धा होणार असून सकाळी ६ वाजता हिरवा झेंडा दाखवून स्पर्धांना सुरुवात होणार आहे.  पेलेटॉन स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून रविवारी (8 जानेवारी) होत असलेल्या पारितोषिक वितरण समारंभाला भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले उपस्थित राहणार आहेत.
 
मिनी पेलेटॉन स्पर्धेत १५ आणि ५० किमीच्या स्पर्धेचा समावेश असून एकूण सहा गटांत या स्पर्धा होतील. ५० किमीची स्पर्धा १८ ते ४० वयोगट (पुरुष), १८ ते ४० वयोगट (महिला), ४० वर्षांपुढील वयोगट (पुरुष), ४० वर्षांपुढील वयोगट (महिला) अशा चार गटांत होणार आहे. स्पर्धेचा मार्ग नाशिक – त्र्यंबक – नाशिक असा असून सिटी सेंटर मॉल पासून स्पर्धेला सुरुवात होऊन एबीबी सर्कल वरून त्र्यंबक रस्ता मार्गे अंजनेरी जवळ यु टर्न घेऊन हॉटेल क्लाउड नाईन येथे स्पर्धेचा समारोप होईल. तर १५ किमीची स्पर्धा १४ ते १८ वयोगट (मुले), १४ ते १८ वयोगट (मुली) अशा दोन गटात होणार असून सिटी सेंटर येथून सुरु होऊन त्र्यंबक रोड वरील हॉटेल वाह नाशिक जवळ संपेल. तेथून सर्व स्पर्धकांना स्पर्धा सुरू झालेल्या ठिकाणी आणण्याचे पूर्ण नियोजन करण्यात आले आहे.
 
त्याचप्रमाणे रविवारी (दि. ८) होणाऱ्या १५० किमीच्या पेलेटॉन स्पर्धेची सुरुवात सकाळी ६ वाजता होणार असून स्पर्धा दोन टप्प्यात नियोजन करण्यात आले आहे. सिटी सेंटर पासून पाथर्डी फाटा तेथून महामार्गावरून कावनई येथे पहिला थांबा देण्यात आला आहे. तेथे आहार घेतल्यानंतर पुढचा टप्पा १२ वाजता चालू होईल.
 
त्याचप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता हौशी सायकलपटूसाठी बागड प्रॉपर्टीज येथून गोदापार्क परिसरालगत असणाऱ्या रस्त्यावर ५ किमी अंतराच्या जॉय राईडचे आयोजन करण्यात आले आहे.
 
दरम्यान १५ आणि ५० किमीच्या मिनी पेलेटॉन स्पर्धेसाठीच्या स्पॉट नोंदणीसाठी प्रचंड प्रतिसाद मिळाला असून नोंदणीचा आकडा १०००च्या वर गेला आहे. शनिवारीसुद्धा नाशिक सायकलीस्टतर्फे १५० किमीच्या पेलेटॉन सर्धेसाठी सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत स्पॉट नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
यादरम्यान अ‍ॅम्बुलन्स व तज्ञ डॉक्टरांचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. रॅम विजेते आणि गोल्डन क्वाड्रीलेटरल ऑफ इंडिया पूर्ण करणारे डॉ. हितेंद्र महाजन यांनी या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन केले आहे. संपूर्ण स्पर्धा नियोजनानुसार वेळेवर चालू होणार असून सर्व नोंदणी केलेल्या स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
स्पर्धेची वैशिष्ट्ये
 
प्रत्येक गटाच्या पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूला ७०००० किमतीची सायकल आणि ३१००० रोख
बक्षिसाची एकूण रक्कम : ​१५​ लाख
घाटातील अंतर कमीतकमी वेळेत पार करणाऱ्या स्पर्धकाला ‘घाटाचा राजा’ किताब